मोकाटे कुटुंबियांची मोठी मागणी...त्या फिर्यादी महिलेला पोलिस संरक्षण मिळावे

मोकाटे कुटुंबियांची मोठी मागणी...त्या फिर्यादी महिलेला पोलिस संरक्षण मिळावे अहमदनगर -माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादी महिलेला पोलिस संरक्षण देण्याची मागणी मोकाटे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आल्याने परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. मोकाटे कुटुंबियांच्या वतीने फिर्यादी महिलेला पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आल्याने सदर फिर्यादी महिलेला धोका कोणापासून आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

     याबाबत मोकाटे कुटुंबियांच्या वतीने गोविंद मोकाटे यांची पत्नी सौ. मीना मोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना फिर्यादी महिलेला तात्काळ पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सदर महिलेने जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन मोकाटे यांच्यापासून धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना मीना मोकाटे यांनी खुलासा करत सदर महिलेला पोलिस संरक्षण देण्याची गरज आहे. गुन्हा दाखल करण्यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असून गुन्हा दाखल करावयास भाग पाडणा-या राजकीय शक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात.


      सदर महिले बाबत काही घटना घडवुन किंवा मारहाण करून त्यात विनाकारण मोकाटे कुटुंबाचे नाव गोवण्याचे षडयंत्र असल्याचा संशय मीना मोकाटे यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत गोविंद मोकाटे यांचे राजकीय, सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा विरोधकांचा डाव आहे. त्यामुळे विरोधक फिर्यादी महिले मार्फत तसेच इतर काही षडयंत्र रचुन खोटे गुन्हे दाखल करू शकतात. आमचा पोलिस यंत्रणा व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला निश्चित न्याय मिळेल. परंतु विरोधक एकामागून एक षडयंत्र रचून गोविंद मोकाटे यांना गुंतविण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी फिर्यादी महिलेला व तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, जेणेकरून यापुढे आमच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत अशी मागणी सौ. मीना मोकाटे यांनी केली आहे.


 आमच्या कुटुंबावर सास-यांचे निधन झाल्याने दुःखद परिस्थिती आहे. आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जेऊर गटातील तसेच तालुक्यातील जनतेला माहिती आहे. उलट फिर्यादी महिलेला पुढे करत आमच्या कुटुंबावर आणखी खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रयत्नात विरोधक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फिर्यादी महिलेला पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे.

 सौ मीना मोकाटे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post