महापौर उपमहापौर म्हणाले..कोरोनाची तिसरी लाट परतवून लावू

 कोरोनाची तिसरी लाट परतवून लावण्यासाठी मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज

महापौर व उपमहापौरांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा नगर - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्ववभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असून ही तिसरी लाट सर्व यंत्रणा आणि नागरिकांच्या सहकार्याने ही लाट परतवून लावू असा विश्वास महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केला आहे.

 उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा प्रशासनास व आरोग्य विभागात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत उपाय योजना करण्याचे पत्र दिले होते त्या पत्राची दखल घेत आरोग्य विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत मनपा आयुक्त शंकर गोरे,उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर,सभागृहनेते अशोक बडे आदीसह मनपाच्या आरोग्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापौर,उपमहापौर यांनी आरोग्य विभागास सूचना केल्या की, नगर शहरामध्ये रुग्ण संख्या वाढत असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या वाढविण्यात याव्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडू नये, यासाठी आरोग्य कर्मचारी भरती करावी, शहरांमध्ये ३११ रुग्ण ऍक्टिव्ह असून २२५ रुग्ण होमक्वारंटाईन आहे व ७० ते ७५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या नऊ दिवसांमध्ये एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. केडगाव - नागापूर तसेच गर्दीच्या ठिकाणी मनपा दक्षता पथकाची नेमणूक करून उपाययोजना कराव्यात  व लसीकरणाबाबत तपासणी करावी अशा सूचना दिल्या.

यावेळी आरोग्य यंत्रणेच्या तयारी विषयी माहिती देताना आरोग्य अधिकारी डॉ. सतिश राजूरकर म्हणाले, शहरात गेल्या आठवडाभरापासून कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी त्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शहरात तिसरी लाट पसरवू नये, यासाठी मनपाची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभी आहे. दररोज शहरात १५०० ते १६०० कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्या सुमारे ३ हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. चाचण्यांची संख्या वाढविल्यावर रुग्ण तातडीने सापडल्यास त्यावर वेळेत उपचार सुरु होवून तो लवकर बरा होईल. त्यामुळे चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. 

नगर शहरात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका सुमारे १ हजार बेडची व्यवस्था करणार आहे. त्यासाठी विळदघाटातील विखे पाटील हॉस्पिटल बरोबर महापालिकेने करार केलेला असून तेथे शहरातील रुग्णांसाठी २०० जनरल बेड, १९३ ऑक्सिजन सुविधा असलेले बेड, ७ आय सी यु आणि व्हेंटीलेटर सुविधा युक्त बेड असे ४०० बेडची सुविधा करण्यात आलेली आहे. 

याशिवाय जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शहरातील रुग्णांसाठी 30 टक्के जागा उपलब्ध करून ठेवलेली आहे. तसेच मनपाचे नटराज हॉटेल येथे २५० बेडचे तसेच पितळे होस्टेल येथे ८० बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. या सर्व ठिकाणी शहरातील रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. काही रुग्णांना रेमडेसीवीरची गरज भासल्यास तेही महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.असे डॉ. सतिश राजूरकर यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post