जितेंद्र निकम, बाळासाहेब गदादे, योगेश गुंड, आदिनाथ शिंदे यांना नगर बाजार समितीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

 जितेंद्र निकम, बाळासाहेब गदादे, योगेश गुंड, आदिनाथ शिंदे यांना  नगर बाजार समितीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर 


नगर - मराठी पत्रकार दिनानिमित्त येथील माजी खा.स्व. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पत्रकारिता पुरस्कार या वर्षी दैनिक दिव्य मराठीचे जितेंद्र निकम, दैनिक पुण्य नगरीचे बाळासाहेब गदादे, दैनिक लोकमतचे योगेश गुंड व दैनिक नगर स्वतंत्र चे आदिनाथ शिंदे यांना जाहीर झाले असल्याची माहिती सभापती अभिलाष घिगे पाटील व उपसभापती संतोष म्हस्के यांनी दिली.

या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दि.७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आ.संग्राम जगताप यांच्यासह बाजार समितीचे संचालक व तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


नगर बाजार समितीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर पुरस्कार्थींचा अल्प परिचय - 

जितेंद्र हरिभाऊ निकम

पुरस्कार प्राप्त जितेंद्र हरिभाऊ निकम हे खडकी गावचे रहिवासी असून दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी असून तालुका पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष आहेत.त्यांनी सार्वमत, समाचार, देशदूत आणि दिव्य मराठी अशा विविध वृत्तपत्रातून लेखन केले. 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.कुटुंबातील राजकीय वारसा, स्वतः ग्रामपंचायत सदस्य,सेवा सोसायटी सदस्य म्हणून पदावर राहिले.पण सक्रिय राजकारनात न जाता  पत्रकारितेला प्राधान्य दिले.कुटुंबाचा राजकिय वारसा असल्याने तालुक्यातील ,जिल्ह्यातील राजकारणाचा मोठा अभ्यास असल्याने राजकीय लिखाणावर मोठे प्रभुत्व आहे.राजकीय आराखडे आणि अंदाज अचूकपणे मांडतात.याबरोबरच आक्रमक लिखानासाठी प्रसिद्ध आहेत.त्यांच्या नगर तालुक्यातील ग्रामपंचायत वृक्ष लागवड घोटाळा बातमीवर आणि  जिल्ह्यातील स्वस्त धान्य घोटाळा बातमीवर विधानसभेत तारांकित प्रश्न विचारले गेले. स्वस्त धान्य बातमीचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कौतुक केले. जिल्हा परिषद मधील पुस्तक खरेदी , अवैध उत्खनन , कोरोना काळात प्रशासनाविरोधात केलेले लिखाण, लसीकरणाची लोकांचे होणारे हाल या बातम्यांची मोठी चर्चा झाली. तालुक्यासाठी आवश्यक असणाऱ्या साकळाई पाणी योजना, घोसपुरी एमआयडीसी , के. के . रेंज विस्तारीकरणाने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यांसाठी सातत्याने लिखाण सुरू आहे.

बाळासाहेब गोरख गदादे

दुसरे पुरस्कार्थी बाळासाहेब गोरख गदादे हे चिचोंडी पाटील येथील रहिवासी असून दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.गेल्या ७-८ वर्षात पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली असून ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. परिसरातील सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.    

योगेश गोपीनाथ गुंड 

तिसरे पुरस्कार्थी योगेश गोपीनाथ गुंड हे दैनिक लोकमतचे नगर तालुका प्रतिनिधी असून तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.त्यांना कॉलेज जीवनापासूनच लिखाणाची आवड आहे.कॉलेज मध्ये असताना त्यांनी शेकडो वाचकांची पत्रे लिहीली ती मोठया वर्तमानपत्रांनी छापली.यांनतर कॉलेजमध्ये शिकत असतानाच ( सन १९९७ ) पत्रकारितेचा डिप्लोमा पुर्ण केला.

त्यांनतर १९९७ पासुन केसरी वर्तमानपत्रात नगर तालुका प्रतिनिधी म्हणुन पत्रकारितेचा श्रीगणेशा सुरू केला. सन २००० पासुन लोकसत्ता या नामांकित वर्तमानपत्रात नगर तालुका व केडगावच्या समस्या मांडत गेले. सन२००६ पासुन लोकमत सारख्या मोठया बॅनरने संधी दिली. तेव्हापासुन म्हणजे आजपर्यत १६ वर्ष होत आले लोकमतचा तालुका प्रतिनिधी म्हणुन काम करीत असुन नगर तालुका पत्रकार संघाचा तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचा आवाज बनुन सात्यत्याने पत्रकारिता करीत गेले आहेत.याआधी नगर पंचायत समितीचा आदर्श पत्रकार पुरस्कार, केडगाव जागृत नागरिक मंचचा आदर्श पत्रकार पुरस्कार,हरिहरेश्वर प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

आजिनाथ रामदास शिंदे 

चौथे पुरस्कार्थी आजिनाथ रामदास शिंदे हे दैनिक नगर स्वतंत्र मध्ये उपसंपादक आहेत. त्यांनी दै. देशदूत मधून सन 2009  पासून पत्रकारीतेला सुरूवात केली. त्यापाठोपाठ पुण्यनगरी, प्रभात, घडामोडी या सारख्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी पत्रकारिता केली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे. मागील महापालिका निवडणुकीत ' मी आहे इच्छूक ' ही मालिका त्यांची चांगलीच चर्चेत होती. सध्या दोन वर्षांपासून दै. नगर स्वतंत्र या वृत्तपत्रामध्ये उपसंपादक या पदावर काम करत आहे. या शिवाय ते एक उत्कृष्ट व्याख्याते आहेत. नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post