वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला खांदा

 वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला खांदासिल्लोड / लिहाखेडी (जि. औरंगाबाद) : देवाचे रूप असलेल्या आईला तिच्या पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली व जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने, संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने खांद्यावर आईची तिरडी घेऊन स्मशानभूमी गाठत अंत्यसंस्कार केले.  औरंगाबादच्या हर्सुल परिसरातील ही घटना असून चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९०, मूळ रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) असे निधन झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्यांना सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे (रा. औरंगाबाद), सुनीता शिवाजी सोने (रा. अनवी), जिजाबाई उत्तम टाकसाळे (रा. कोटनांद्रा), तर जाऊबाई छाया शिरसाठ (रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) यांनी खांदा दिला.    

मुलांनी चंद्रभागाबाईंना वाऱ्यावर सोडले होते. पण तरीही त्या माऊलीला आपल्या तिन्ही मुलांना भेटायची इच्छा होती. अनेक वेळा तिन्ही मुलांना फोन करूनही ते आईला बघायला फिरकले नाहीत. शेवटी मुलांच्या भेटीविनाच तिने आपले प्राण त्यागले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post