२०१३ नंतरच्या टिईटी शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी, घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय


२०१३ नंतरच्या टिईटी शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी, घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय  नगर:  पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र सादर करून, शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या व इयत्ता आठवी वर्गापर्यंत शिक्षण अध्यापनाचे काम करणार्‍या शिक्षकांना त्यांचे टीईटी प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करायचे आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र पाठवून येत्या दोन दिवसांत आपल्याकडील टीईटी प्रमाणपत्रांवर नियुक्त झालेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश काढले आहेत.


विविध परीक्षांच्या पेपरफुटीबरोबरच टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आला. त्यात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह परीक्षा घेणार्‍या कंपनीच्या प्रमुखांचा मोठा हात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकर्‍या मिळविल्या आहेत का किंवा बनावट प्रमाणपत्र देऊन शिक्षकांची फसवणूक झाली आहे का, हे समोर येऊ शकते.

राज्य परीक्षा परिषदेने सर्व संबंधित शिक्षण अधिकार्‍यांना आदेश दिल्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्वच शाळांना पत्र पाठविले आहे. 13 फेब्रुवारी 2013 नंतर ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या इयत्ता आठवी वर्गापर्यंत अध्यपनासाठी झाल्या आहेत, अशा शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्राची प्रत शिक्षण विभागाला सादर करावी, असे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये ते प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post