नगर तालुक्यातील 'या' गावाचा मोठा निर्णय, शाळा चालूच ठेवणार

 

नगर तालुक्यातील 'या' गावाचा मोठा निर्णय, शाळा चालूच ठेवणारनगर- कोविड संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता राज्यातील शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आदर्शगाव हिवरेबाजार (ता. नगर) येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरूच राहणार असल्याचा निर्णय बुधवारी झालेल्या पालक-विद्यार्थी सभेत घेण्यात आला.

पालकांनी आम्ही मुलांची काळजी घेत जबाबदारी घेऊ असे सांगत शाळा सुरू ठेवण्यात यावी असे मत मांडले. तर विद्यार्थ्यांनी हातवर करून शाळा सुरू ठेवण्यात याव्यात याबाजूने पाठिंबा दिला. जर शाळा बंद केली तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करू असाही इशारा विद्यार्थ्यांनी दिला. यानंतर शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

करोनाच्या तिसर्‍या लाटेतील रोजची वाढती रूग्णसंख्या पाहता राज्य शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यात राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षणक्षेत्रात आणि पालकांत नाराजीचा सूर आहे. विशेषतः शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भविष्य धोक्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी आदर्शगाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत पालक-विद्यार्थी सभेत हिवरेबाजार येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post