वाढदिवस विशेष....माणुसकी जपणारे सज्जन राजकारणी : माजी आ.दादाभाऊ कळमकर

 माणुसकी जपणारे सज्जन राजकारणी : माजी आ.दादाभाऊ कळमकर



राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते, माजी आ. दादाभाऊ कळमकर यांचा वाढदिवस आज (दि.5 जानेवारी) साजरा होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नगर जिल्ह्यातील एकनिष्ठ नेते म्हणून कळमकर ओळखले जातात. राजकारणातील प्रदीर्घ वाटचालीत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची त्यांची हातोटी सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख.....

पारनेर तालुक्यातील छोट्याशा गावात अतिशय साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेले दादा कळमकर हे शिक्षण व व्यवसायानिमित्त नगरला आले व कायमचे नगरकर झाले. स्वत: अतिशय गरीबी पाहिलेली असल्याने सुरुवातीपासूनच सर्वसामान्य, गोरगरीबांकडे त्यांचा ओढा होता. यातूनच त्यांनी नगरमध्ये आपला झोपडी कॅन्टीनचा व्यवसाय सांभाळतानाच समाजकारणातही उडी घेतली. पुढे त्यांच्यातील नेतृत्त्वगुण त्यांना राजकारणात घेवून गेले. दिग्गज उमेदवाराचा पराभव करून त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली व पुढे अनेक वर्षे त्यांनी नगरपालिकेत अभ्यासू वृत्तीने काम करीत अनेक विकासकामे मार्गी लावली. याच काळात त्यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क आला व पुढे त्यांचे राजकारण हे शरद पवार यांच्या अवतीभोवतीच राहिले. पवार साहेब जिथे तिथे दादा असे समीकरणच रूढ झाले. त्यामुळेच 1985 मध्ये त्यांना नगर शहरातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी ही निवडणूक लढवत इतिहास घडवला. नव्वदच्या दशकात राजकारणाचा बाज बदलला. परंतु, पवार साहेबांनी सलग पाच वेळा दादांनाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर तब्बल बारा वर्षे त्यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळून पक्ष संघटना मजबूत करण्यात मोठे योगदान दिले. माझी व दादांची मैत्री 1970 पासूनची आहे.  यात माजी उपनगराध्यक्ष लियाकत शेखही होते. मैत्री अशी की आमचे कौटुंबिक संबंध अतिशय जिव्हाळ्याचे झाले. त्यांच्या मातोश्री मला तिसरा मुलगा मानत. या प्रदीर्घ राजकीय प्रवासात दादांबरोबर अनेक जण आले व गेले. मी व लियाकत शेख यांनी मात्र मात्र सावलीप्रमाणे त्यांची साथ कधीच सोडली नाही. नगर शहरात मला दादांचा लहान भाऊ समजतात.  त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत मी त्यांचा उजवा हात म्हणून काम केले आहे. 15 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता असताना मला आर.आर.पाटील, बबनराव पाचपुते, दिलीप वळसे पाटील अशा दिग्गजांचा सहवास मिळाला. ते सुध्दा आमच्या मैत्रीचे आवर्जून कौतुक करतात. 

दादांचा स्वभाव अतिशय चांगला असून कधीही कोणाला दुखावण्याचे काम त्यांनी केले नाही. आपल्याकडून कोणाला कधी त्रास होईल असे कृत्य त्यांनी कधीच केले नाही. माणुसकी, मैत्री जपणारे अतिशय सज्जन राजकारणी म्हणून ते मला कायम भावतात. माझ्यासाठी थोरले बंधू असलेल्या दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, याच आजच्यानिमित्त शुभेच्छा!

- कासम शेख, नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post