मनपा पोटनिवडणूक पॅम्प्लेट वरून वादंग, काँग्रेस नेत्यांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही - कॉंग्रेसने डागली तोफ

 मनपा पोट निवडणूक पॅम्प्लेट वरून वादंग, काँग्रेस नेत्यांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही - कॉंग्रेसने डागली तोफ    प्रभाग ९ च्या मनपा पोटनिवडणुकीत प्रचाराचा काल शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या सुरेश तिवारी या उमेदवारांच्या प्रचाराचा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. काँग्रेसचा एकही नेता, पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. मात्र तिवारी यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचाराच्या पॅम्पलेट वरून नवीन वादंग उभे राहिले आहे. काँग्रेस नेत्यांचा अवमान काँग्रेस कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत, असा आक्रमक इशारा काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. 

उमेदवार सुरेश तिवारी यांच्या प्रचाराचे पॅम्पलेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. सोशल मीडियावर एक पॅम्पलेट फिरत आहे तर प्रत्यक्षात प्रिंट करून प्रभागामध्ये दुसरेच पॅम्पलेट वाटण्यात येत आहे. प्रभागात मतदारांना वाटण्यात येणाऱ्या पॅम्पलेटवर काँग्रेस नेत्यांचा अवमान झाला असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. राज्याचे विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे राज्य सरकार मध्ये पक्षाच्यावतीने क्रमांक एकचे नेते म्हणून नेतृत्व करतात. राज्य सरकारच्या सर्व जाहिराती व प्रसिद्धी पत्रकामध्ये प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्री (शिवसेना), उपमुख्यमंत्री (राष्ट्रवादी) व महसूल मंत्री (काँग्रेस) या तीन नेत्यांचे याच क्रमाने सत्तेतील तीन पक्षांचे नेते या नात्याने फोटो नेहमी प्रसिद्ध केले जातात. मात्र सुरेश तिवारी यांच्या प्रसिद्धी पत्रकावर मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेले व सर्वात ज्युनियर मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्रा नंतर महसूल मंत्री ना. थोरात यांचा फोटो टाकून अवमान करण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. 

एवढेच नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे एका राष्ट्रीय पक्षाचे राज्याचे प्रमुख आहेत. ते विधानसभेचे माजी सभापती आहेत. त्यांचा प्रोटोकॉल हा मोठा असताना देखील त्यांना देखील शिवसेनेच्या ज्युनियर मंत्र्या नंतर स्थान देण्यात आल्यामुळे त्यांचा ही अवमान झाला आहे. ना. थोरात व प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांचा अवमान यावर झाला आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना दुखावणारी असल्याचे मत काँग्रेसचे प्रवीण गीते पाटील यांनी व्यक्त केली आहे.शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराचे नेते या नात्याने किरण काळे, याच प्रभागातील काँग्रेस पक्षाचे शहराचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष, माजी महापौर तसेच प्रदेश काँग्रेसचे सचिव दीप चव्हाण तसेच काँग्रेस पक्षाच्या याच प्रभागातील विद्यमान लोकप्रिय नगरसेविका शीला चव्हाण यांचा फोटो जाणीवपूर्वक या पत्रकावर टाकण्यात आलेला नाही. याकडे काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post