मांजराचा आवाज काढला असेल तर गैर काय ? कोण अजित पवार? मी ओळखत नाही...

मांजराचा आवाज काढला असेल तर गैर काय ? कोण अजित पवार? मी ओळखत नाही कणकवली: विधिमंडळाच्या आवारात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवणारे भाजप आमदार नितेश राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तुम्ही मतदारांच्या पाठिंब्याने सभागृहात निवडून आला आहात, तुम्ही कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचे प्रतिनधी नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. सभागृहात अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावर नारायण राणे यांना पत्रकारपरिषद सुरु असताना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर नारायण राणे प्रचंड संतापले. कोण अजित पवार? मी त्याला ओळखत नाही. जनतेच्या पैशांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणाऱ्याचे दाखले तुम्ही मला काय देता, असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजराचा आवाज काढला असेल तर त्यामध्ये गैर काय होते? आदित्य ठाकरे यांना या गोष्टीचा राग का यावा? वाघाची मांजर कधी झाली. त्यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? माझ्या मते आदित्य ठाकरे यांचा आवाज तसा नाही. आदित्य ठाकरे तिथून जात असताना एखादा वेगळा आवाज काढला असता तर मग लगेच त्यांना त्या प्राण्याची उपमा लागू होते का, असा सवालही नारायण राणे यांनी विचारला. सध्याच्या घडीला नितेश राणे हे विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट काम करणारा आमदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. सभागृहात नितेश राणे यांच्यासमोर येऊन बोलण्याची कोणाचीही ताकद नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post