नगर तालुक्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन ,परिसरात भितीचे वातावरण पिंजरा लावण्याची मागणी

 जेऊर मध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन

परिसरात भितीचे वातावरण ; पिंजरा लावण्याची मागणीनगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन वारंवार घडत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आहे. सोमवार दि. ६ रोजी जेऊर परिसरातील शेटे वस्ती नजीक खारोळी नदीच्या पुलावर बिबट्याचे दर्शन झाल्याने जेऊर परिसरात असणाऱ्या बिबट्याच्या वास्तव्याच्या चर्चेस पुष्टी मिळाली आहे.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून जेऊर परिसरात विविध ठिकाणी बिबट्याने दर्शन दिलेले आहे. भिवा घुले यांच्या तीन मेंढ्या व एक कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. तसेच नरेंद्र तोडमल व दादा काळे यांच्या कुत्र्याची शिकार बिबट्या कडून करण्यात आली होती. त्यावेळी वनविभागाकडून ठसे तपासणी केल्यानंतर बिबट्याच असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मागील आठवड्यात राम शंकर तोडमल यांनी आपल्या उसाच्या शेतात दोन बछडे पाहिल्याचे सांगण्यात आले परंतु वन विभागाकडून त्यावेळी बिबटे नसुन तरस असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

        खारोळी नदीच्या पुलावर तेजस शेटे, संकेत तोडमल, ओम तोडमल या तरुणांनी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर नजीक अपघातात एका सात वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला होता. वनविभागाच्या वतीने उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक मनेष जाधव, वनकर्मचारी तुकाराम तवले, संजय सरोदे, संजय पालवे, मुकेश साळवे, बाळकृष्ण पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु नदिला असणारे पाणी व बाजुला मोठ्या प्रमाणात झाडोरा असल्याने ठसे आढळुन आले नाही.

पिंजरा लावण्याची मागणी

जेऊर परिसरात तीन चार महिन्यांपासून बिबट्याचे वास्तव्य आढळून आले आहे. मेंढ्या व कुत्र्यांची शिकार करण्यात आल्याचे प्रकारही घडलेले आहेत. एका बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या वास्तव्यामुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास घाबरत आहेत. तसेच लहान मुलांमध्ये भीतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वन विभागाने परिसरामध्ये तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.

 दत्तात्रय डोकडे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती)

वनविभागाच्या वतीने जनजागृती

जेऊर परिसरात बिबट्यांचे वास्तव्य आढळून आल्याने वन विभागाच्या वतीने जेऊर परिसरामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्या पासून संरक्षण कसे करावे या माहितीचे पत्रके वाटण्यात येत आहेत. डोंगर वस्ती च्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वनपाल शैलेश बडदे वनरक्षक मनेष जाधव यांच्या वतीने सर्व नागरिकांनी दक्षता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्या की तरस याबाबत संभ्रम

जेऊर परिसरातील गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात तरस हा प्राणी आढळून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तरस पाहिल्यास शेतकऱ्यांना तो बिबट्याचा असल्याचे जाणवते. जेऊर परिसरामध्ये बिबट्यांचे वास्तव्य असले तरी तरस ही मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने नागरिकांचाही संभ्रम होत असल्याचे दिसून येते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post