गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, नगरमध्ये गुन्हा दाखल


गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, नगरमध्ये गुन्हा दाखलनगर: जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरुद्ध नगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत याच्यासह सात संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणात गुंतवणूकदारांची प्रथमदर्शनी तब्बल 7 कोटी 68 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील सतीश बाबूराव खोडवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नेवासे तालुक्यातील पाथरवाला येथील मुळ रहिवासी सोमनाथ राऊत (हल्ली मुक्काम माऊली रेसिडेन्सी, पाईपलाइन रोड, सावेडी) याने पत्नी सोनिया राऊत, वंदना पालवे (केडगाव), सुप्रिया आरेकर (बुर्‍हाणनगर), प्रितम शिंदे (पुणे), प्रिती शिंदे (बालिकाश्रम रस्ता, नगर) आणि शॉलमन गायकवाड (रा. सावेडी) यांना संचालक करून बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची डिसेंबर 2019 मध्ये स्थापन केली. त्याअंतर्गत फंड पे नावाचे वॉलेट सुरू केले. पतसंस्था, मोबाईल रिचार्ज, टीव्ही चॅनेलचे रिचार्ज, वीज बिल भरणा आदी सेवा देण्यास सुरूवात केली.

कंपनीमार्फत ऑनलाईन बिल देण्याची सेवा दिली जात होती. कंपनीमध्ये एक लाख रकमेची गुंतवणूक केल्यानंतर दरमहा तीनशे ते दीड हजार रुपयांचा परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते. कंपनीचे बँक खाते आयसीआयसीआय आणि आरबीएल या बँकेत उघडण्यात आले होते. गुंतवणूकदारांना या खात्यात ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा होती. पाचशे रुपयांपासून 50 लाख रुपये या कंपनीत गुंतविता येत होते. पाचशे ते एक हजार रुपयांची गुंतवणूक करणारे सुमारे साडे चार लाख गुंतवणूकदार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post