हुकुमशाही पध्दतीच्या व आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याच्या सत्ताधार्‍यांच्या कामावर सभासदांमध्ये तीव्र नाराजी

 जि.प.कर्मचारी सोसायटीत श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनलच्या माध्यमातून परिवर्तन निश्चित : सुभाष कराळे

हुकुमशाही पध्दतीच्या व आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याच्या सत्ताधार्‍यांच्या कामावर सभासदांमध्ये तीव्र नाराजीनगर : जिल्हा परिषद कर्मचारी सभासदांसाठी कामधेनू असलेल्या सोसायटीत मागील काही वर्षात चुकीचा व हुकुमशाही पध्दतीने कारभार झाल्याने सभासदांत नाराजी आहे. पूर्वी सत्तेत असलेल्या श्री पावन गणेश मंडळाने केलेला कारभारच संस्था व सभासद हिताचा होता याची प्रचिती आज येत आहे. त्यामुळे आताच्या निवडणुकीत सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारदर्शी व सभासद हिताचा कारभार करण्याचे ध्येय ठेवून आमचे पॅनल कारभार करणार आहे. श्री गणेश पॅनलने स्वयंस्फूर्तीने आमच्या पॅनलला बिनशर्त जाहीर पाठिंबा देवून आमच्या विचारांना आणि चांगल्या कारभाराला दाद दिली आहे. विद्यमान सत्ताधार्‍यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम केले. आता सभासदच परिवर्तनाच्या तयार आहेत, अशी भूमिका श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनलचे प्रमुख सुभाष कराळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. 

या पत्रकार परिषदेला पॅनल प्रमुख आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर डिसले, शिवाजी भिटे, विकास साळुंके, शशिकांत रासकर, आबासाहेब घोडके, नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वंदना धनवटे, डॉ. सुरेश ढवळे, बाळासाहेब यादव, विलास वाळूंज, सोपान हरदास, संतोष कोळगे, किरण खेसम्हासळकर, रमेश जावळे, अशोक लिंगडे, योगेश राळेभात, गीतांजली कोरडे, महेंद्र आंधळे, रमेश औटी, नारायण बोराडे, आशा घोडके, विद्या निराळी आदी उपस्थित होते.

कराळे पुढे म्हणाले की, पतसंस्थेतील सध्याच्या सत्ताधार्‍यांच्या कारभाराला सभासद कंटाळलेले आहे.  2003 ते 2014 या कालावधीत आमच्या पॅनलची सत्ता असताना सोसायटीचा प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवण्यात आम्ही यश मिळवले आहे. आमच्या सत्तेपूर्वी संस्थेकडे फक्त 36 लाखांच्या ठेवी होत्या, त्या आजमितीस तब्बल 90 कोटींच्या आहेत. सभासदांचा विश्वास प्राप्त करून संस्थेची नगर शहराच्या वैभवात भर घालणारी अतिशय दिमाखदार इमारत आमच्याच सत्ताकाळात उभी राहील. आधुनिक बँकिंगप्रमाणे संगणकीकृत कामकाजाची मुहूर्तमेढ आमच्याच सत्ताकाळात रोवली गेली. त्यामुळेच आज सभासदांना सर्व व्यवहार मोबाईल एसएमएसव्दारे घरबसल्या काळतात. लाभांशही थेट सभासदांच्या खात्यावर वर्ग होतो. कर्जाची रक्कमही खात्यावर ऑनलाईन वर्ग होते.सोसायटीचे कर्जावरील व्याजदर पूर्वी 16 टक्के होते ते 12 टक्क्यावर खाली आणण्याचे काम आमच्याच सत्ताकाळात झाले.  मागील पाच सहा वर्षे सत्तेत असणार्‍यांचा कारभार हा आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार होता.  सभासद कल्याण निधीतून सुध्दा सभासदांच्या विरोधाला डावलून 2 हजार रुपयांची कपात विद्यमान सत्ताधार्‍यांनी हुकुमशाही पध्दतीने केलेली आहे. त्याचे योग्य नियोजन न झाल्याने आज मयत सभासदांचे दोन ते अडीच कोटी कर्जमाफ करणे बाकी आहे. सभासदांकडील थकबाकीबाबतही योग्य नियोजन न केल्याने सुमारे दोन कोटी पाच लाखाची थकबाकी वसुली होणे बाकी आहे. सर्वार्थाने चुकीचा कारभार केल्याने सभासदांमध्ये सत्ताधार्‍यांबाबत तीव्र नाराजी असून प्रचारादरम्यान आमच्या पॅनलला मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे, असेही कराळे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post