माझ्या विजयासाठी शहरप्रमुख कदम, आ.जगताप यांनीही प्रयत्न केले, कॉंग्रसने हास्यास्पद आरोप करू नये, सुरेश तिवारी यांचा खुलासा

 पत्रकबाजीपुरत्याच मर्यादीत असलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍याने स्वतःच्या अस्तित्वाचे आत्मपरीक्षण करावे ः सुरेश तिवारीनगर : महानगरपालिकेच्या प्रभाग 9 मधील एका जागेसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडी होऊन शिवसेनेच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आली. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढविली. शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसचे प्रभागातील नेते दीप चव्हाण, माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्यासह प्रभागातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत भरपूर मेहनत घेतली. मात्र, अवघ्या 500 मतांनी पराभव झाला.

 जनतेचा कौल मान्य करत पराभवाची कारणे शोधून त्यावर पक्षपातळीवर चिंतन होईलच. निवडणुकीत हार-जीत होतच असते. मात्र, ज्यांना निवडणूक म्हणजे काय असते, हेच आजपर्यंत उमगले नाही त्या काँग्रेस पदाधिकार्‍यांनी निकालानंतर शिवसेना शहरप्रमुखांवर आरोप करणे निव्वळ हास्यास्पद आहे. केवळ स्वतःच्या व वैयक्तिक द्वेषापोटी महाविकास आघाडीत विघ्न आणण्याचा ज्यांनी सुरूवातीपासूनच प्रयत्न केला, त्यांचा बालिशपणा या आरोपांमुळे स्पष्ट झाला आहे. महाविकास आघाडी व शिवसेना या पराभवाचे आत्मपरीक्षण करतीलच. मात्र, पत्रकबाजी करुन शिवसेना शहरप्रमुखांवर आरोप करणार्‍यांनी आधी स्वतःचे अस्तित्व काय, याचेही आत्मपरीक्षण करावे.


राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी केली आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय व पक्षादेश मानून स्थानिक पातळीवर तिन्ही पक्ष एकमेकांशी समन्वयातून काम करत आहेत. पक्षीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून पक्षासाठी, महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सर्वांनी एकत्र येत निवडणुकीत काम केले. शिवसेनेच्या संभाजी कदम यांच्यासह सर्वच पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्थानिक पक्षीय मतभेद बाजूला ठेवून काम केले. विशेषतः या प्रभागातील काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेनेला मोठ्या ताकदीने साथ दिली. दीप चव्हाण, धनंजय जाधव यांच्यासह काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीत सक्रियपणे काम करत होते. निवडणुकीतील पराभवाची कारणे आम्ही शोधूच, पराभवाचे आत्मपरीक्षणही आम्ही करुच.

 मात्र, निकालानंतर पत्रकबाजी करुन स्वतःचे नसलेले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी त्यांचे या प्रभागात काय अस्तित्व होते, किती ताकद होती, याचे आत्मपरीक्षण पत्रक काढणार्‍यांनी करावे. राष्ट्रवादीसोबत असलेल्या वैयक्तिक द्वेषापोटी पत्रकबाजी करुन शिवसेनेअंतर्गत ‘ट्विस्ट’ निर्माण करणे, शहरप्रमुखांवर पराभवाचे खापर फोडणे असे उद्योग त्यांनी करु नयेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आदेश डावलून निवडणुकीपासून अलिप्त राहणार्‍यांना निकालावर बोलण्याचा मुळीच अधिकार नाही. त्यातच शिवसेना शहरप्रमुखांवर आरोप करुन बालिश पदाधिकार्‍यांनी प्रसिध्दीचा खटाटोप करु नये. ज्यांना फोटोपुरताच मान-सन्मान हवा होता, त्यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाचे परीक्षण करावे. पत्रकबाजी करुन शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण होईल, असा प्रयत्नही करु नये व ज्या काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही अपमान करु नये. महाविकास आघाडी भाजप विरोधात एकत्र येत असताना काँग्रेसमधील काहींना मात्र, शिवसेना व महाविकास आघाडीच्या पराभवाचा व भाजपच्या विजयाचाच अधिक आनंद होत असल्याचे दिसत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post