नगर -बीड - परळी रेल्वे मार्गावरील मेहेकरी पूलाचे काम पूर्ण,लवकरच नगर ते आष्टी रेल्वेमार्गावर होणार चाचणी

 नगर -बीड - परळी रेल्वे मार्गावरील मेहेकरी पूलाचे काम पूर्ण

लवकरच नगर ते आष्टी रेल्वेमार्गावर होणार चाचणी



फोटो ओळी : नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाअंतर्गत कुंठेफळ येथील 500 मीटर लांबीचा सर्वात मोठा मेहेकरी पूल बांधून पूर्ण झाला आहे. (छाया: विक्रम लोखंडे,नगर)

नगर (सचिन कलमदाणे) : नगर आणि मराठवाड्याला जोडणार्‍या बहुप्रतीक्षित नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या कामाने आता गती पकडली आहे. 262 कि.मी.अंतराचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प 2022 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने या मार्गावरील पुलांचे काम वेगाने सुरु आहे. यातील सुमारे 500 मीटर लांबीचा 33.5 मीटर उंचीचा कुंठेफळ येथील मेहेकरी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता लवकरच नगर ते आष्टी या 64 कि.मी.अंतराची रेल्वेची चाचणी प्रत्यक्षात घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) विजयकुमार रॉय यांनी दिली.
1997 मध्ये मंजुरी मिळालेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जलद वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. मधल्या काळात निधीच्या कमतरतेमुळे या मार्गाचे काम रखडले होते. या रेल्वेमार्गासाठी सुरुवातीला दोन हजार 826 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या अंदाजित खर्चापैकी 50  टक्के खर्चाचा हिस्सा उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारही निधी उपलब्ध करून देत असल्याने गेल्या पाच वर्षात या कामाने वेग पकडला आहे.  
 मागील दोन वर्षात नगर ते नारायण डोहो व नारायण डोहो ते सोलापुरवाडी अशा दोन टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली आहे . आता या मार्गात येणार्‍या सर्वात मोठ्या कुंठेफळ येथील मेहेकरी ब्रीजचे काम पूर्ण झाले आहे. हा पुल 500 मीटर लांबीचा असून या पुलाचे काम पुर्ण झाल्याने आता सोलापुरवाडी ते आष्टी या 32 कि .मी. अंतराची चाचणी घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गातील नगर ते आष्टी या 64 कि .मी . अंतराचा महत्त्वपुर्ण टप्पा पुर्ण होणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post