नामदेव राऊत यांच्या प्रभागात माजी मंत्री राम शिंदे यांचा जोरदार प्रचार.... कर्जतमधील हाय व्होल्टेज लढत

 नामदेव राऊत यांच्या प्रभागात माजी मंत्री राम शिंदे यांचा जोरदार प्रचार.... कर्जतमधील हाय व्होल्टेज लढतकर्जत (आशिष बोरा):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकडे पाहिले जाते अशा प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाचे उमेदवार शरद म्हेत्रे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी नागराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले असून त्यांना प्रभागात वाढता पाठींबा मिळत असल्याचे प्रा राम शिंदे यांनी प्रचार रॅलीत बोलताना राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 

               कर्जत शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पहावयास मिळत आहे, राष्ट्रवादीने दोन प्रभागात आपल्या खेळीने वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करताना नागरिकांना गृहीत धरले आहे व याचा अत्यंत वाईट परिणाम जनमानसावर झाला आहे, शहरातील सर्वात चर्चेत असलेल्या लढतीत आमच्या पक्षाचे उमेदवार शरद म्हेत्रे यांनी तगडे आव्हान जनतेच्या विश्वासावर उभे केले आहे, त्याच्या प्रचाराला अत्यंत उत्फुर्त प्रतिसाद सर्वत्र मिळत असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी कर्जत येथे प्रभाग 12 मध्ये घरोघरी जाऊन प्रचार करताना दिली. लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जाऊन जनतेच्या मताचा आदर करण्याची निवडणूक ही संधी असताना ती नाकारून पैशाच्या जोरावर, दडपशाही करत, दबाव आणून लोकांच्या मताधिकाराला सामोरे न जाण्याची राष्ट्रवादीची कार्यपद्धती कर्जत मधील जनतेला पटलेली नाही, ज्या जागांवर त्यांना खात्री वाटत नाही तेथे ते येन केन मार्गाचा वापर करत आहेत, सत्ता येते जाते पण लोक तेच असतात व ते सर्व पाहत असतात, अशी पद्धत यापूर्वी कर्जत जामखेड मतदार संघात कधीही नव्हती, कर्जत नगर पंचायतीच्या रूपाने राष्ट्रवादीच्या दहशतीचा ट्रेलर पहायला मिळाला आहे त्यामुळे त्याचा चित्रपट पहायचा का नाही हे जनता ठरवणार आहे व त्याचा परिणाम मतदानातून पहावयास मिळणार आहे, असे म्हणत प्रा राम शिंदे यांनी आपण अधिक उत्साहात प्रचारात आहोत असे म्हटले.

           प्रभाग 12 मध्ये भाजपाचे उमेदवार शरद म्हेत्रे यांचा माजी नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या विरुद्ध सामना आहे, याबाबत शरद म्हेत्रे यांनी बोलताना पाच वर्ष राऊत भाजपात होते, माजी मंत्री प्रा राम शिंदेच्या काळात सर्व अधिकार राऊत यांच्या कडेच होते, त्याकाळातील अनेक वक्तव्य आज प्रसारीत होत असून आता राऊत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत उडी घेऊन कर्जतकराना मोठा धक्का दिला, मात्र गेली पाच वर्षात त्यांनी जी वक्तव्ये केले, भाजपाचे,  भाजपातील नेत्यांचे जे गोडवे गायले, राष्ट्रवादीवर जी खरपूस टीका केली ती राऊत  विसरले, राष्ट्रवादीवाले विसरले मात्र जनता विसरलेली नाही. त्यामुळे राऊत यांना भाजपावर प्रा. राम शिंदेवर बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत राऊत यांच्या बद्दल सर्वाना सर्व माहिती आहे, त्यामुळे मी पुन्हा त्यावर बोलणार नाही. जनता सुज्ञ आहे,  माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यांला साथ देत आहे हीच खूप मोठी बाब आहे. आगामी दोन दिवसात नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना, अमिषाला बळी पडू नये असे आवाहन शरद म्हेत्रे यांनी यावेळी केले. या प्रचार रॅलीत भाजपाचे अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

              कर्जत शहरात सर्वात हॉट सीट म्हणून या प्रभागाकडे पाहिले जात असून सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे, त्यामुळे या प्रभागाच्या निकालाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात असून अफवांचे पीक आले आहे, कर्जतची नगर पंचायत निवडणूक सध्या अनेक कारणाने गाजत असून भाजपा व राष्ट्रवादी च्या प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post