कोरोनाकाळात पंतप्रधान कुठे गायब होते? हे अमित शहांनी सांगावे

 दलालांचा ठेकेदार भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे बोट करू नये !: नाना पटोले.


राजीनामा देऊन निवडणुका घ्यायच्या तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा.


कोरोनाकाळात पंतप्रधान कुठे गायब होते? हे अमित शहांनी सांगावे.  मुंबई: देशातील महत्वाच्या सार्वजनिक कंपन्या आपल्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणारा देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’चे काम करणाऱ्या भारतीय जनात पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर आरोप करणे हेच हास्यास्पद आहे. राफेलमधील दलाली, नोटबंदीमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याच्या मोबदल्यात कोणत्या पक्षाच्या लोकांनी करोडो रुपयांची दलाली खाल्ली हे देशाच्या जनतेला माहित आहे, असे खरमरीत उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.

अमित शहा व भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, ‘डीबीटी’ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना १ जानेवारी २०१३ रोजी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने सुरु केली त्याचे श्रेयही अमित शहा भाजपाला देत आहेत हे दुर्दैवी आहे. काँग्रेसच्या चांगल्या योजना स्वतःच्या नावावर खपवून बिनदिक्कतपणे खोटे बोलणे हे भाजपाची पद्धतच आहे. पण त्या योजनेचा शब्दच्छल करत ‘डिलर’, ‘ब्रोकर’, ट्रान्सफर अशा उपमा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर टीका करणारा भारतीय जनता पक्षच खऱ्या अर्थाने या देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’ आहे. ‘राफेल’ सौद्यात करोडो रुपयांची दलाली कोणी खाल्ली? नोटबंदीमध्ये नोटा बदलण्याच्या कामात कोणत्या पक्षाच्या लोकांनी भरमसाठ दलाली केली? आणि देशातील सार्वजनिक बँका, विमानसेवा, विमानतळ, रेल्वे, रस्ते, विमा कंपनी हे खाजगी उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या ‘डिल’ कोणी केल्या आणि त्यासाठी ‘ब्रोकर’चे काम करत कोणी पैसे खाल्ले हे जनतेला माहित आहे. त्यामुळे आतातरी भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याचे उद्योग थांबवावेत.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन निवडणुका घ्यावात हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांनी लोकशाहीचा सन्मान करायला शिकले पाहिजे. सत्तेच्या गुर्मीत असणारेच अशी वक्तव्ये करतात. महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्रातील भाजपा सरकारही बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, मग पहा भाजपाविरोधात देशातील जनतेत किती असंतोष आहे हे तुम्हाला कळेल, असे प्रतिआव्हान नाना पटोले यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांना शोधावे लागते असे म्हणणाऱ्या अमित शहा यांनी पंतप्रधान कुठे असतात ते सांगावे. कोरोनाकाळात लाखो हिंदू लोकांचाही जीव गेला त्यावेळी हिंदुत्वाचे हे ठेकेदार काय करत होते? कोरोनाकाळात पंतप्रधान गायबच होते , ते फक्त टीव्हीवरच दिसायचे, त्यांनाच शोधावे लागते. १४ महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होता तेंव्हा पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटताना दिसले नाहीत, ते कुठे होते ? असे सवालही काँग्रेस प्रदेशाध्यांनी विचारले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post