भाजपच्या प्रदीप परदेशी यांचा राष्ट्रवादीकडून सत्कार, कॉंग्रेसने घेतला आक्षेप, पक्षश्रेष्ठींना पाठवणार अहवालमहाविकासआघाडी उमेदवाराचा पराभव करत निवडून आलेल्या भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादीने केला सत्कार

 रविवारच्या शहर काँग्रेस बैठकीत राज्याच्या महाविकास आघाडी नेत्यांना याबाबत अहवाल पाठविण्याची जिल्हाध्यक्ष किरण काळेंकडे मागणी करणार - मनोज गुंदेचा**नगर : मनपा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये उडालेला धुरळा अजून शमायचे नाव घ्यायला तयार नाही. महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव करत भाजपाने ही जागा आपल्याकडे खेचून घेतली. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने लढलेल्या शिवसेना उमेदवार सुरेश तिवारी यांचा पराभव करणाऱ्या भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांचा राष्ट्रवादीने चक्क निवडून आल्याबद्दल सत्कार केल्यामुळे समाज माध्यमांवर त्या सत्काराचा फोटो व्हायरल झाला असून शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहेत. या गोष्टीची गंभीर दखल काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आली असून रविवारी शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना राष्ट्रवादीने भाजपच्या केलेल्या सत्काराबाबतचा अहवाल पाठविण्याची मागणी जिल्हाध्यक्ष काळे यांना करणार असल्याचे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.


याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गुंदेचा यांनी म्हटले आहे की, एका बाजूला राष्ट्रवादीचे आमदार पुत्र हे महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडतात. तर दुसऱ्या बाजूला त्याच उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर  भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीचे आमदार पिता सत्कार करत त्यांना राष्ट्रवादीच्या वतीने शुभेच्छा देतात. ही खेदाची बाब आहे. यातून असा सवाल उपस्थित होतो की राष्ट्रवादीच्या आमदार पिता-पुत्रांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात अंधारातून काम करत महाविकास आघाडी उमेदवाराचा "करेक्ट कार्यक्रम" केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून महाविकासआघाडीला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. *

काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आ.अरुण जगताप हे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप परदेशी यांचा सत्कार करतानाचा फोटोच प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या रविवारी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रवादीने भाजपच्या केलेल्या सत्कारा बाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, काँग्रेसचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख ना. उद्धव ठाकरे, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आदींना राष्ट्रवादीने भाजपाचा सत्कार केल्याचा अहवाल तसेच या निवडणुकीत अंधारात नेमके घडले काय याचा वस्तुनिष्ठ अहवाल हा महाविकास आघाडीच्या वरील सर्व प्रमुख नेत्यांना पाठविण्याबाबत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष यांच्याकडे मागणी करणार असल्याचे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post