मनसे सोडून शिवसेनेत जाण्याच्या वृत्तावर बाळा नांदगावकर यांचा मोठा खुलासा.....

 

राज ठाकरेंचे अतिशय निकटचे नेते बाळा नांदगावकर मनसे सोडणार असल्याची चर्चा....पुणे: पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. अशातच आता मनसेला मुळापासून हादरवणारा मोठा धक्का मिळणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतला आणि मनसेच्या स्थापनेच्या काळात त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.  बाळा नांदगावकर 'घरवापसी' करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.त्यामुळे मनसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पोस्ट वर मोठा खुलासा केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की,

तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम.

मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. सोशल मीडिया च्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस माहीतच आहे. 

मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात.

खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील.

त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही. 

कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही व जे ओळखून पण खोडसाळपणा करतात त्यांना सांगून काही फायदा नाही. एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका कडव्यात सांगून जाते.


"तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम".


आपला नम्र

बाळा नांदगावकर🙏🏻🙏🏻🙏🏻

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post