रोहित पवार, निलेश लंके यांना मंत्रिपद? विखे-पाटील म्हणतात नगरमध्ये मंत्रालयच बांधा....


रोहित पवार, निलेश लंके यांना मंत्रिपद? विखे-पाटील म्हणतात नगरमध्ये मंत्रालयच बांधा....



नगर :   नगर जिल्ह्यातील आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांना राज्य सरकारमध्ये  मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. यावरून खा.सुजय विखे-पाटील यांनी टीका केली आहे.    जिल्ह्यात दोन नाही तर  सहा मंत्रीपदे देऊन अहमदनगर जिल्ह्याला राज्याची राजधानी घोषित करावी असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गरज पडली तर नगरमध्ये एखादे मंत्रालय देखील बांधता येईल, असा खोचक टोला विखे यांनी लगावला

सध्या जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केलीये. तसेच त्यांनी माहाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोनही नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारची कामगिरी जनता पाहात आहे. दोन वर्षांतील ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे भाजपाला पारनेर आणि कर्जत अशा दोनही मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे. कर्जतचे माजी  नगराध्यक्ष नामदेव राऊत राष्ट्रवादीत गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र विरोधकांचा अजून उमेदवारच ठरला नाही. रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याबद्दल जर जनतेला विश्वास वाटत असेल तर त्यांच्या उमेदवाराला निवडून द्यावे. मात्र त्यामुळे भविष्यात पश्चताप करण्याची वेळ येऊ शकते अशी टीका त्यांनी यावेळी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post