भारत मातेचा थोर सुपुत्र.... कोण होते जनरल बिपिन रावत?....वाचा सविस्तर...

भारत मातेचा थोर सुपुत्र.... कोण होते जनरल बिपिन रावत?....वाचा सविस्तर... मुंबई : तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात  अखेर सीडीएस जनरल बिपिन रावतयांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. देशासाठी ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे. संपूर्ण देश या घटनेमुळे हळहळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून बिपिन रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.


बिपिन रावत  हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. सीडीएसचे काम लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी रावत हे एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते.

बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. त्यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला होता.

 त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 रोजी यश मिळाले. त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. 

सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली होती. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post