दोन महिन्यांपूर्वीच पत्र दिले होते...जिल्हा रूग्णालय अग्निकांड प्रकरणी शिवसेनेचा मोठा खुलासा

 

दोन महिन्यांपूर्वीच पत्र दिले होते...जिल्हा रूग्णालय अग्निकांड प्रकरणी शिवसेनेचा मोठा खुलासानगर: नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील आगीनंतर  शिवसनेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचा निष्काळजीपणा आणि हेकेखोर वृत्तीमुळे आग लागल्याचा आरोप केला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी पोखरणा यांना दिलेल्या पत्राचा शिवसनेने दाखला दिला आहे. 

 ‘ज्या अतिदक्षता विभागात आग लागली, तेथील सदोष वीज जोडण्यांकडे लक्ष वेधत दुरुस्ती करण्यासंबंधी बांधकाम विभागाचे वीज तांत्रिक अभियंता जगदीश काळे यांनी डॉ. पोखरणा यांना दोन महिन्यांपूर्वीच पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही झाली असती तर ही दुर्घटना टळली असती,’ असा दावा शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे. 

जाधव यांनी सांगितले की, ‘ही घटना घडल्यानंतर मी, संजय वल्लाकट्टी आणि मंदार मुळे यांनी लगेच नगरच्या सार्वजनिक विभागाचे वीज तांत्रिक अभियंता जगदीश काळे यांच्याशी संपर्क साधला. या घटनेस आपणच जबाबदार असल्याचा जाब त्यांना विचारला. तेव्हा काळे यांनी आम्हाला हे पत्र दाखविले. ते पत्र काळे यांनी डॉ. पोखरणा यांना लिहिलेले आहे. त्यात म्हटले आहे की, सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील वायरिंग सदोष आहे. तेथील एसी २४ तास सुरू असतात. एसीचे पाईप आणि सोबत ऑक्सिजनचेही पाइप गेलेले आहेत. या पाइपवर कमी तापमानामुळे बर्फ साठतो. नंतर तो वितळून त्याचे पाणी विजेच्या वायरिंगवर पडते. त्यामुळे तेथे शॉर्ट सर्किट होण्याचा मोठा धोका आहे. असे शॉर्ट सर्किट होऊन वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकारही तेथे सुरू होते. ही तांत्रिक चूक दुरुस्त करावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, असे पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. ६ सप्टेंबर २०२१ रोजी हे पत्र काळे यांनी जिल्हा रुग्णालयाला पाठविलेले आहे. मात्र, हेकेखोरपणा करणारे डॉ. पोखरणा यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते, असा आरोप जाधव यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post