नगर तालुक्यातील सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द करण्याचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला

 सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला
अहमदनगर -आदर्शगाव मांजरसुंबा (ता. नगर) येथील सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द प्रकरण जिल्हाभर गाजले असताना, यावर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या समोर अंतिम सुनावणी होऊन तक्रारदारांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

आदर्शगाव मांजरसुंबा (ता. नगर) ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मच्छिंद्र कदम, सरपंच मंगल कदम, किरण कदम, कविता वाघमारे, प्रशांत कदम, रूपाली कदम या सहा सदस्यांविरोधात निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर न केल्याप्रकरणी त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा अर्ज रामनाथ गोविंद कदम व इतर तीन अर्जदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे ३०मार्च २०२१ रोजी केला होता.

ग्रामपंचायत सदस्यांकडून उमेदवारांना खर्च दाखल करण्यास झालेल्या उशीराची बाजू अ‍ॅड. संकेत नंदू बारस्कर यांनी जिल्हाधिकारी यांच्यापुढे लेखी मांडली. विजयी उमेदवारांपैकी काही आजारी होते. तर इतरांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर इतर सुट्टीमुळे त्यांना हा खर्च दाखल करण्यास उशीर झाल्याची लेखी युक्तीवाद अ‍ॅड. बारस्कर यांनी केला. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर उमेदवारांनी निवडणुक खर्चाचा हिशोब विहीत व खर्चाचे संक्षिप्त विवरण पत्र मुदतीत सादर केलेले असून, शपथपत्र तीन दिवसांनी सादर केल्याचे दिसून येते. कोरोना झालेल्या उमेदवारांनी जिल्हा रुग्णालय नागरी आरोग्य केंद्राचे कोरोना पॉझिटिव्ह प्रमाणपत्र व इतर आजारी उमेदवारांनी खासगी हॉस्पिटलचे वैद्यकिय प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. प्रस्तुत प्रकरणी प्रतिज्ञापत्र विलंबाने सादर करणेकामी झालेला उशीर योग्य व रास्त कारणामुळे झालेला असून, याबाबत पुरावा सादर करण्यात आला आहे. त्यांना अपात्र करणे योग्य होणार नसल्याचे नमुद करुन तक्रारदारांचा अर्ज नामंजूर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. या आदेशाने विजयी उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या बाजूने अ‍ॅड. बारस्कर यांनी तर तक्रारदारांच्या वतीने अ‍ॅड. युवराज पाटील यांनी काम पाहिले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post