नगर तालुक्यातील 'या' सोसायटीतील अपहाराची २ कोटीची रक्कम सचिवासह तत्कालीन संचालकांकडून वसुलीचे आदेश

 जेऊर सोसायटीतील अपहाराची २ कोटीची रक्कम सचिवासह तत्कालीन संचालकांकडून वसुलीचे आदेशनगर तालुक्यातील जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तत्कालीन २३ संचालक व सचिव यांचेकडून संस्थेत झालेल्या अपहारापोटी १ कोटी ९८ लाख ८२ हजार ८८१ रुपये इतक्या रकमेची व्याजासहित वसुली करण्याचे आदेश प्राधिकृत चौकशी अधिकारी अॅड. सुधीर जी. शेटे यांनी काढले आहेत.


जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जेऊर, ता.नगर या संस्थेत दि.३१ मार्च २०१८ अखेर १ कोटी ३९ लाख ४१ हजार १८४ रुपये इतक्या रकमेच्या झालेल्या अपहाराची संबंधितांवर जबाबदारी निश्चिती करण्यासाठी नगर तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे यांनी अॅड. सुधीर जी. शेटे यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.  

जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व तालुका उपनिबंधक के.आर.रत्नाळे यांचे मार्गदर्शनाखाली ॲड. सुधीर जी. शेटे यांनी जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. जेऊर या संस्थेची कलम ८८ अन्वये चौकशी पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल दि. १८/१०/२०२१ रोजी सादर केला. सदर अहवालात संस्थेच्या अपहार रकमेची व्याजासह वसूली करण्याचे आदेश दिले आहेत.


चौकशी अधिकारी यांनी संस्थेचे तत्कालीन २३ संचालक व सचिव यांचेवर आरोपपत्र निर्गमित केले व सदर अपहारास त्यांना जबाबदार धरले. आपल्या आदेशात अॅड. सुधीर जी. शेटे यांनी अपहाराची रक्कम व्याजासह १ कोटी ९८ लाख ८२ हजार ८८१ रुपये वसुलीचे आदेश दिले आहेत.


संबंधित संचालक यांचेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९५ अन्वये कारवाई करून अपहाराच्या वसुलीसाठी प्राधिकृत चौकशी अधिकारी अॅड. सुधीर जी. शेटे यांनी संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त केलेल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post