२५ वर्षे नको ती अंडी उबवली...भाजपसोबतच्या युतीवर मुख्यमंत्र्यांनी केलं खोचक भाष्य

 

२५ वर्षे नको ती अंडी उबवली...भाजपसोबतच्या युतीवर मुख्यमंत्र्यांनी केलं खोचक भाष्यपुणे:  इन्क्युबेशन सेंटर उभारणारी संस्था तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं काम करते. हे काम खूप आव्हानात्मक आणि मोठं आहे. इन्क्युबेशन सेंटरला मराठीत उबवण्याचं केंद्र म्हणतात. आम्हीदेखील २५ वर्षे हे सेंटर चालवलं. त्यात नको ती अंडी उबवली. त्यांचं पुढे काय झालं ते तुम्ही पाहिलंत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबतच्या २५ वर्षांच्या युतीवर खोचक भाष्य केलं.  बारामतीमधील इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबाच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोले लगावले.

पवार कुटुंबानं राज्यासाठी केलेलं काम खूप मोठं आहे. शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला. ते अजूनही थांबायला तयार नाहीत. त्यांचं काम अविरत सुरू आहे. मी दुसऱ्यांदा बारामतीला आलो आहे. पहिल्यांदा आलो तेव्हा शेतीचं प्रदर्शन पाहिलं. आज देशातलं सर्वात मोठं इन्क्युबेशन सेंटर पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंब विकासाच्या ध्यासानं काम करतंय, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवार परिवाराचं कौतुक केलं.

टीकाकर असलेच पाहिजेत. पण चांगल्या कामात अडथळे आणणं ही आपली संस्कृती नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगितली. आम्ही शरद पवारांचे टीकाकार होतो. पण तरीही शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. शरद बाबू बारामतीत काय करतात, ते जाऊन पाहायला हवं, असं बाळासाहेब म्हणायचे. हीच आपली संस्कृती आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post