आमची काय चूक ? अग्निशामक यंत्रणा बसवणे हे काय आमचे काम आहे का ? जिल्हा रूग्णालयात परिचारिकांचे आंदोलन

आमची काय चूक ? अग्निशामक यंत्रणा बसवणे हे काय आमचे काम आहे का ? जिल्हा रूग्णालयात परिचारिकांचे आंदोलन नगर-  जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये 6 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीला आणि त्यामध्ये झालेल्या मृत्यूला जबाबदार धरून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह एकूण सहा जणांना निलंबित आणि सेवानिवृत्तीचा आदेश काढलेला आहे. 

या कारवाईमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये कार्यरत असलेल्या तीन परिचरिकांचा समावेश असल्याने शासनाने केलेली  कारवाई ही अन्यायकारक असल्याचे सांगत आज मंगळवारी सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आरोग्य कर्मचारी यांनी सांगितले की अतिदक्षता विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाची सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा याची जबाबदारी ही वरिष्ठांची आणि त्या स्तरावरील विभागांची असते. मात्र अचानक आग लागल्यानंतर त्यास जबाबदार धरून परिचरिकांना निलंबित करणे, सेवा समाप्ती करणे  हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे निलंबन/सेवा समाप्ती कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी अन्यथा राज्यभरातील परिचारिका संवर्गातील कर्मचारी आवाज उठवतील आंदोलन करतील. त्याचबरोबर यापुढे अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यास नकार दिला जाईल असा इशारा या वेळी देण्यात आलेला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post