वेळप्रसंगी गडाखांप्रमाणे स्वतंत्र लढू... माजी आमदार विजय औटी यांचे वेगळे 'संकेत'

 

शिवसेनेला डावलले जातंय.... वेळप्रसंगी गडाखांप्रमाणे  स्वतंत्र लढू... माजी आमदार विजय औटी यांचे वेगळे 'संकेत'पारनेर: पारनेर विधानसभा मतदारसंघावर तीन वेळा शिवसेनेचा भगवा फडकावणारे माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी पुन्हा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत. मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत पारनेरला झालेल्या शिवसेना मेळाव्यात त्यांनी सध्याच्या राजकारणावर परखड भाष्य केले. 

या कार्यक्रमात बोलताना औटी म्हणाले की, ‘आगामी निवडणुकांत राज्य पातळीवर आघाडीसंबंधी काय निर्णय होईल याची कल्पना नाही, मात्र पारनेर तालुक्यात घड्याळाला मत द्यायला सांगायला आम्हाला जमणार नाही. एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर त्याला या संधीचे सोने करता येते. पारनेर तालुक्यात मात्र गेल्या दोन वर्षांत लोकप्रतिनिधीने संधीचं लोखंड केल्याचं पाहायला मिळते. सामान्य माणूस भरडला जात असेल, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर या वयातही रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. हिंमत असेल तर समोरासमोर युक्तीवाद करायला यावे. गेल्या १५ वर्षांत शिवसैनिकांचा संच मी सांभाळला. राजकारणात उलथापालथ होत असते. मी काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. माझे वडील आमदार होते. पत्नीही विविध पदांवर होती. जनतेने आमच्या कुटूंबावर प्रेम केले. पारनेर तालुक्यात जनतेला वेगळ्या पद्धतीने नेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. जिल्हा दूध संघावर प्रतिनिधी नेमण्यात आले, त्यावेळी शिवसेनेचा प्रतिनिधी घेतला नाही. जिल्हा बँकेतही शिवसेनेला संधी दिली गेली नाही. आमच्यासोबत असं होणार असेल तर आम्हालाही शंकरराव गडाख यांनी बॅट घेतली त्याप्रमाणे हाती तलवार घ्यावी लागेल,’ असं सांगून वेळप्रसंगी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेतही औटी यांनी दिले आहेत.

मागील काळात आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगताना औटी म्हणाले, ‘मागील सरकारमध्ये पहिला अन्याय माझ्यावरच झाला. नैसर्गिक निर्णय प्रक्रियेप्रमाणे तीन महिन्यांत माझ्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद येणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. प्रादेशिक पक्ष संपविण्याचं धोरण भाजपने अवलंबण्यास सुरुवात केली. त्यामुळेच भाजप सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन्याचा निर्णय घेतला. त्या सर्व प्रक्रियेचा मी जवळचा साक्षीदार आहे,’ असंही औटी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post