पंचवीस वर्ष विश्‍वास जपल्यानेच सभासद आपल्या कायम पाठीशी

 पंचवीस वर्ष विश्‍वास जपल्यानेच सभासद आपल्या पाठीशी कायम-कैलास भोसले

मिरवणूक काढत जनसेवा पॅनलच्या उमेदवारांचे अर्ज दाखलअहमदनगर- गेल्या 5 निवडणुकात सर्वसामान्य सभासद आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. सभासदांचा विश्‍वास जपल्यामुळेच या निवडणुकीतही जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्‍वास जनसेवा पॅनलचे प्रमुख कैलास भोसले यांनी व्यक्त केला आहे. 

अहमदनगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कैलास भोसले यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सन 2021 ते 2026 या पंचवार्षिक कालावधीसाठी 18 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. 

या निवडणुकीत गेली 27 वर्ष ज्यांची पतसंस्थेवर एकहाती सत्ता होती ते कैलास भोसले यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलनेही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून त्याच्या पॅनलमधून सर्वसाधारण गटात कैलास हरिभाऊ भोसले, बाळ जगन्नाथ विधाते, राजेंद्र शिरसाठ, अशोक कराळे, महादेव कोतकर, ऋषिकेश लखपती, नरेंद्र पेवाल, प्रकाश आजबे, गणेश लयचेट्टी, प्रशांत चांदणे, महिला राखीव मधून नंदा भिंगारदिवे, भीमाबाई काळे, इतर मागास प्रवर्गातून राहुल साबणे, अनुसूचित जाती जमाती गटा मधून प्रसाद उमाप, तर भटक्या विमुक्त जाती गटामधून बाबासाहेब राशिनकर यांनी सोमवारी (दि.22) उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांच्या पॅनलकडून यापूर्वीही काही उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले असून मंगळवारी (दि.23) दाखल अर्जांची छाननी झाल्यानंतर जनसेवा पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याचे जनसेवा पॅनलचे प्रमुख कैलास भोसले यांनी सांगितले.

यावेळी बोलताना कैलास भोसले म्हणाले, पतसंस्थेत 25 वर्ष सभासदांच्या हिताच्या योजना राबविल्या. मयत सभासदांचे 1 लाखा पर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता यापुढे मयत सभासदांचे संपुर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. जनसेवा पॅनल हा गरीब सभासदांना मदत करणारा पॅनल आहे. हे गेले 25 वर्ष सर्व सभासद अनुभवत आहेत. त्यामुळेच ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सध्या जो विरोधी पॅनल आहे त्यातील बहुतांशी संचालक हे मागील निवडणुकीत आपल्या पॅनलमधून निवडून आलेले होते. मात्र त्यांच्या चुकीच्या कामामुळे आम्ही 3 संचालक स्वत:हून त्यांच्यापासून बाजुला गेलो. त्यांनी आता स्वत:च्या कर्तृत्वावर निवडून येवून दाखवावे. 

निवडणुकीत विजयी होण्याचा त्यांचा जर दावा असेल तर त्यांनी स्वत:चे चिन्ह घेऊन निवडणुक लढवावी, मी जनसेवा पॅनलसाठी गेल्या 5 निवडणुकीत जे चिन्ह घेतले त्याच चिन्हाची मागणी त्यांनी केली आहे. नवीन चिन्हावर निवडून येण्याची शाश्‍वती नसल्यानेच ते हे उद्योग करत आहेत. ही निवडणुक खेळीमेळीत व शांततेच्या वातावरणात पार पडावी ही आपली ईच्छा आहे. संस्थेचे सभासद हे महापालिकेत एकत्र काम करतात त्यामुळे विरोधी पॅनलनेही वाद होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे जाहीर आवाहन आपण त्यांना करत असल्याचे कैलास भोसले म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post