नगर तालुक्यात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

 नगर तालुक्यात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये  भितीचे वातावरण
अहमदनगर- नगर तालुक्यातील सारोळा कासार परिसरात मंगळवारी (दि.9) रात्री बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या पथकाने या परिसरात केलेल्या पाहणीत बिबट्याच्या पायाचे ठसे शेतात आढळून आले असून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


सारोळा कासार गावाजवळ सारोळा ते सुभाषवाडी रस्त्यावर मंगळवारी (दि.9) रात्री 8.30 च्या सुमारास गावातील बाळासाहेब लिंभोरे हे आपल्या कुटुंबियांसह कारमधून जात असताना त्यांच्या कारला बिबट्या आडवा गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही बाब काही नागरिकांना सांगितली. 

याबाबत नगर विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनाही कळविण्यात आले. त्यांनी वनविभागाचे पथक बुधवारी (दि.10) सकाळी सारोळा कासारमध्ये पाठवले. या पथकाने ज्या परिसरात बिबट्या दिसला तेथे पाहणी केली असता शेतामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनपाल अनिल गावडे व वनरक्षक मानसिंग इंगळे यांनी ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.

सारोळा कासार आणि परिसरात प्रथमच बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या भितीने शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास घाबरू लागला आहे. तसेच दिवसाही शेतात फिरण्याची भिती वाटू लागली आहे. या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, तसेच महावितरण कंपनीने शेती पंपासाठी रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.

शेतात पाणी देण्यासाठी जाताना एकटे जावु नये, एक तरी जोडीदार न्यावा.

मोबाइल वर मोठ्या आवाजात गाणे लावावेत.

हातात टाॅर्च, एक मोठी काठी ठेवावी.

लहान मुलांची काळजी घ्यावी, त्यांना घराबाहेर पडू देवु नये.अशा सुचना वनविभागाने दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post