नगर मधील धक्कादायक प्रकार लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार तरुणीचा मृत्यू

 नगर मधील धक्कादायक प्रकार ; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्यावर गर्भवती राहिलेल्या तरुणीला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्याने तरुणीचा मृत्यू
अहमदनगर -लग्नाचे आमिष  दाखवून तरुणीशी तिच्या इच्छे विरुध्द शरीरसंबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली, त्यावेळी तिचा गर्भपात व्हावा याकरिता तिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बळजबरीने गोळ्या खाऊ घातल्या. गोळ्या खाल्ल्यावर तरुणीची प्रकृती खालावत जावून तिचा मृत्यू झाल्याची घटना नगर शहरातील माळीवाडा परिसरात घडली. या प्रकरणी सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या बाबतची माहिती अशी की वडिलांसह माळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला आरोपी सईद ताहेर बेग ( वय.३३, रा. संजयनगर, काटवन खंडोबा ) याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसबंध ठेऊन तिच्या इच्छे विरुध्द तिच्याशी  शरीरसंबंध ठेवले. त्या तरुणीने सईदकडे लग्न करण्याबद्दल विचारणा केली.असता त्याने तिला उडवाउडवीचे   उत्तर दिले. सईद याचे या पुर्वी दोन लग्न झाले होते. असे असताना त्याने अविवाहित असल्याचे सांगितले अन गोड बोलून तिच्याशी तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. तीला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व शारीरिक छळ केला.त्यातुन ती तरुणी गर्भवती झाली.

त्या तरूणीने पुन्हा लग्नाबाबत विचारले असता सईद याने तिचा गर्भपात व्हावा म्हणून गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या.ज्यामुळे तिचा मृत्यू होईल याची जाणीव असताना कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता त्या तिला बळजबरीने खाऊ घातल्या.  त्या मूळे त्या तरुणीला पोटदुखी, उलटी, अतिरक्तस्राव झाल्याने तिला उपचाराकरिता शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे दाखल केले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना दि.१७ नोव्हेंबर रोजी घडली. त्यानंतर याप्रकरणी मयत तरुणीच्या नातेवाईकांनी शनिवारी (दि.२०) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी सईद ताहेर बेग याच्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ३०४, ३७६ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास शहर विभागाचे प्रभारी उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे असून मिटके यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपअधीक्षक मिटके यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post