‘या’माजी आमदाराच्या घरासमोर दिवाळीच्या दिवशी खर्डा-भाकरी खाउन निषेध आंदोलन,

‘या’माजी आमदाराच्या घरासमोर दिवाळीच्या दिवशी खर्डा-भाकरी खाउन निषेध आंदोलन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक


 नगर : अशोक सहकारी साखर कारखान्याने  दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना  जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत सेकंड पेमेंट  करून शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणे अपेक्षित होते परंतु एक रुपयाही न देऊन अशोकच्या प्रशासनाने   शेतकर्‍यांची दिवाळी काळी केली आहे. याचा निषेध म्हणून शेतकरी दिवाळीच्या दिवशी  4 नोव्हेंबर रोजी अशोक सहकारी साखर कारखान्याचे  सूत्रधार माजी आ. भानुदास काशिनाथ मुरकुटे  यांच्या जिद्द या निवासस्थानासमोरील शासकीय


जागेत खर्डा-भाकर खाऊन निषेध करण्याचा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  दिला आहे.

याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले व सुरेश पाटील ताके यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, अशोकने आजपर्यंत फक्त भूल थापा दिलेल्या आहेत. आसवनी उभारणीच्यावेळी 200 रुपये प्रति टन सभासद शेतकर्‍यांना फायदा होईल तसेच इथेनॉल प्रकल्प उभारणीच्या वेळीही तसेच आश्वासन दिले होते. 110 कोटींच्या 15 मेगावॉट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीच्या वेळीही अशोकच्या संचालक मंडळाने 200 रुपये जास्त मिळतील अशा वल्गना केल्या होत्या.

परंतु अशोकने कधीही आसवनी, इथेनॉल तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प नसलेल्या कारखान्यांपेक्षा जास्त दर दिलेला नाही. ज्या कारखान्यांकडे दारू आहे असेच कारखाने जास्त दर देऊ शकतात असे कारखान्याचे सूत्रधार सांगतात मग दारूचे उत्पादन नसलेला संगमनेर कारखाना जास्त दर कसा देऊ शकतो असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. मागील वर्षी अशोकच्या संचालक मंडळाने बी. हेवी व सी. हेवी मळीच्या सवलतीचा फायदा घेऊन कारखान्याची रिकव्हरी किमान 1.5 टक्के कमी दाखवली याचा तोटा पुढच्या वर्षीच्या दरात होईल असा आरोप संघटनेने केला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post