तिकीट संग्रह हा छंदांचा राजा- भिंगारवाला

 तिकीट संग्रह हा छंदांचा राजा- भिंगारवाला
"तिकीट संग्रह" हा छंदांचा राजा व राजांचा छंद असून हा छंद जोपासण्यासाठी वैयक्तिक आवड व प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध टपाल तिकीट  संग्राहक गिरीधरलाल भिंगारवाला (झंवर) यांनी केले. अहमदनगर प्रधान डाक घर येथे राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त विविध ऐतिहासिक व दुर्मिळ टपाल तिकिटे व पाकिटांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते, त्यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


9 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्टोबर हा आठवडा दरवर्षी भारतीय टपाल खात्यामार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. यावर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस टपाल तिकीट संग्रह दिवस म्हणून साजरा केला गेला. त्यानिमित्ताने अहमदनगर प्रधान डाक घर येथे नागरिकांसाठी खुल्या स्वरूपात भव्य टपाल तिकीट प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी विविध टपाल तिकीट संग्राहक यांनी संग्रह केलेली टपाल तिकिटे व पाकिटे यांचे प्रदर्शन भरवले होते. या तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन गिरीधरलाल भिंगारवाला यांच्या हस्ते झाले. यावेळी गोपाळ भिंगारवाला, सचिन डागा, अब्दुल शेख यांची संग्रहित तिकीट सामग्री प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये निघालेली, विविध तिकिटे प्रदर्शित केली होती. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामधील विविध ऐतिहासिक वास्तू यांच्या वर निघालेली विशेष आवरणे देखील प्रदर्शित केली होती. अनेक दुर्मिळ अशी प्राचीन तिकिटे पहावयास मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केडगाव पोस्ट ऑफिस चे पोस्टमास्तर संतोष यादव यांनी केले. सध्याच्या आधुनिक युगामध्ये देखील पोस्ट ऑफिसचे महत्व टिकून आहे कारण पोस्ट खात्याने काळाबरोबर आधुनिकतेची कास धरून तंत्रज्ञान अमलात आणले व लोकाभिमुख सेवा दिली. पोस्टाची जनमानसातील प्रतिमा आज देखील पूर्वीप्रमाणेच आहे असे त्यांनी सांगितले. 

डाक निरीक्षक संदीप हदगल यांनी आपल्या मनोगतात पोस्ट खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली.  तसेच आजादी का अमृत महोत्सव यावर्षी पोस्ट खात्यामार्फत साजरा केला जात असल्याने देशातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेल्या सर्व महापुरुषांवर तिकिटे, पाकिटे काढली जात आहेत व त्यांच्या कार्याला उजाळा दिला जात आहे असे सांगितले. पोस्टाच्या विविध योजना लोकांच्या पर्यंत खेडोपाड्यात पोहोचवल्या जातील व त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केले. यावेळी गोपाळ भिंगारवाला, सचिन डागा, अब्दुल शेख, मिलिंद भोंगले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मोठ्या संख्येने नागरिक व पोस्टाचे कर्मचारी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. अहमदनगर प्रधान डाक घराचे वरीष्ठ पोस्टमास्तर महेश तामटे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post