जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारी करणार्‍या २ टोळ्यांवर ‘मोक्का’ची कारवाई

 नगर जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारी करणार्‍या २ टोळ्यांवर ‘मोक्का’ची कारवाई अहमदनगर - जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारी करणार्‍या २ टोळ्यांमधील १२ जणांवर जिल्हा पोलिसांनी ‘मोक्का’ अन्वये कारवाई केली आहे. यामध्ये नगर तालुक्यातील साहेबा काळे व श्रीगोंदा तालुक्यातील संतोष शिंदे यांच्या टोळ्यांचा समावेश आहे.

नगर तालुक्यातील साहिबा गजानन काळे याच्यासह 5 जणांच्या टोळीवर नगर तालुका पोलिस ठाण्यात 20 जुलैला दरोडा, फसवणूक करणे याबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास करताना या टोळी अनेक गंभीर स्वरुपाचे संघटीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून साहेबा गजानन काळे (वय ४८, रा.दहिगाव, ता.नगर), परमेश्वर रविकांत काळे (वय २०), शिवदास रामदास भोसले (वय २३, दोघे रा.घोसपुरी, ता.नगर), विजय गजानन काळे, समाधान गजानन काळे (दोघे रा.दहिगाव, ता.नगर) या ५ जणांच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यातील विजय व समाधान काळे हे दोघे अद्याप फरार आहेत. 

त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील कुख्यात गुन्हेगार संतोष राघू शिंदे, चंदू भाऊसाहेब घावटे (वय २८), राजेंद्र बबन ढवळे (वय ३१, तिघे रा.राजापूर, ता.श्रीगोंदा), चेतन काळूराम कदम (वय २१), सागर विनोद ससाणे (वय २१, दोघे रा.देवदैठण, ता.श्रीगोंदा), राजू उर्फ राजेंद्र मधुकर उबाळे (रा.कुरुंब, ता.पारनेर), शफीक शब्बीर शेख (वय ३४, रा.नारायण गव्हाण, ता.पारनेर) या सात जणांच्या टोळीविरुद्धही ‘मोक्का’ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post