ओळखीचा फायदा घेऊन कांदा व्यापार्‍याच्या मालट्रकची चोरी

 नगर मधील कांदा व्यापार्‍याच्या मालट्रकची चोरी  
नगर मधील कांदा व्यापार्‍याकडे ओळखीचा फायदा घेऊन आलेल्या चौघांनी त्यांची मालट्रक विकत देण्याची मागणी केली. मात्र व्यापार्‍याने मालट्रक विकायची नाही, असे सांगितल्यानंतर या आरोपींनी ती मालट्रक चोरुन नेल्याची घटना औरंगाबाद रोडवरील तवलेनगर येथे घडली. 

याबाबत गणेश मुरलीधर तवले (वय ३८, रा.तवलेनगर, नगर-औरंगाबाद रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.२५) सायंकाळी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की त्यांचा कांद्याचा व्यापार असून या व्यापारातून त्यांची बैंगलोर (कर्नाटक) मधील काही व्यक्तींशी ओळख झालेली होती. या ओळखीतून टिफन, प्रसाद, रियाज व 1 अनोळखी इसम असे चौघेजण ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्या औरंगाबाद रोडवरील कार्यालयात आले. त्यांनी ‘आम्हाला तुमची मालट्रक खूप आवडली आहे, तुम्ही आम्हाला ती विकत द्या’ अशी मागणी केली. मात्र तवले यांनी ‘मालट्रक विकायची नाही’, असे त्यांना सांगितले. 

त्यानंतर तवले हे त्या चौघांसाठी चहा आणण्यासाठी गेले. त्या दरम्यान या चौघांनी त्यांची मालट्रक (क्र.एम.एच.१६, ए.वाय.९०८६) चोरुन नेली. तवले परत आल्यानंतर त्यांना मालट्रक दिसली नाही. तसेच हे चौघेही कार्यालयात आढळून आले नाही. त्यानंतर त्यांनी मालट्रकचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तवले यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात येवून मालट्रक चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. 

या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघा संशयीत आरोपींविरुद्ध भा.दं.वि.क. ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post