कार्य कर्तृत्वामुळे कर्मयोगी आबासाहेब काकडे आजही जिवंत आहेत

 चांगल्या कार्य कर्तृत्वामुळे लाखो माणसांच्या ह्रदयात आजही कर्मयोगी आबासाहेब काकडे जिवंत आहेत - ह.भ.प.गणेश महाराज डोंगरेशेवगाव (संदीप देहाडराय):  : जीवनामध्ये माणूस किती जगला याला  महत्त्व नाही तर तो कसा जगला याला महत्त्व आहे.आबासाहेबांच्या कार्य कर्तृत्वामुळे लाखो माणसांच्या ह्रदयात आजही कर्मयोगी आबासाहेब काकडे जिवंत आहेत.जो स्वतः साठी जगला त्याला मानव म्हणत नाही परंतु जो दुसऱ्यासाठी जगला तो कर्मयोगी होय ते व्यक्तीमत्व म्हणजे आबासाहेब होय असे प्रतिपादन ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे यांनी केले.
             आज आबासाहेब काकडे विद्यालयात कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा ४३वा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुय्यम निबंधक गोकुळ नागरे हे होते तसेच व्यासपीठावर भारुड सम्राट हमीद सय्यद बापूसाहेब राशिनकर देवराव दारकुंडे दिनकरराव गर्जे, मा.प्राचार्य कारभारी नजन सर,उत्तमराव आहेर, गोकुळ भागवत, भाऊसाहेब महाराज, प्राचार्य संजय चेमटे, उपप्राचार्य सुनील आढाव, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, मंदाकिनी भालसिंग, रूपा खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
          गणेश महाराज पुढे म्हणाले की, प्रयत्न करणारा माणूस जीवनात कधीच हारत नाही. आबासाहेबांचे जीवन त्रासदायक असताना देखील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी ते लढले. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आयुष्यात वाईट वागणार नाही अथवा करणार नाही असे करणे म्हणजे आबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.
             कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारुड सम्राट हमीद अमिन सय्यद म्हणाले की, ध्येयाचा ध्यास असेल तर श्रमाचा त्रास वाटत नाही. शाळा ही मंदिरे व मानवास देवता मानणारे आबासाहेब होते. समतेचा संदेश देणारे आबासाहेब हे महान कर्मयोगी होते असे प्रतिपादन त्यांनी केले. आबासाहेबांच्या कार्याची महती त्यांनी भारुडाद्वारे सांगितली.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळ नांगरे म्हणाले की, आबासाहेबांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले. सर्व संतांच्या विचारांचा आबासाहेबांवर खूप प्रभाव होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आबासाहेबांच्या विचारांवर पावलावर पाऊल ठेवून जीवनात प्रगती करावी. प्रत्येकाने सकारात्मक विचार करावा यशस्वी होणे सोपे आहे परंतु सद्गुणी व्हावे असे मार्मिक विचार त्यांनी मांडले. त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी कु.कार्तिकी म्हस्के व शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापिका वंदना पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले.
          कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 43 व्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गुणवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच याप्रसंगी विद्यालयातील आजी-माजी कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाजी पोटभरे यांनी केले आभार गोविंद वाणी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रम कोरोना विषयक नियमांचे पालन करून घेण्यात आला.
संलग्‍नके क्षेत्र

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post