वाळकी हत्याकांडातील ३ आरोपींना पोलिस कोठडी; अन्य ८ आरोपी झाले फरार

 वाळकी हत्याकांडातील ३ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी; अन्य ८ आरोपी झाले फरार
नगर तालुक्यातील वाळकी येथील युवकाच्या हत्याकांड प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी ११ आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असून त्यातील ३ आरोपींना अटक केली आहे. या तिघा आरोपींना सोमवारी (दि.१८) दुपारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि.२२ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित ८ आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती तपासी अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी दिली.

सायकल लावण्यावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन दोन कुटुंबातील वादात होऊन यात एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावात रविवारी (दि.१७) दुपारी घडली होती, भांड्याचे व्यापारी गनीभाई तांबोळी यांचा मुलगा जावेद गनीभाई तांबोळी (वय ३८) असे यातील मयताचे नाव आहे. तर गनीभाई इब्राहीम तांबोळी (वय ६२) हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी मिनाज जावेद तांबोळी यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध भा.दं.वि.कलम ३०२, ३०७, ३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९,३४ अन्वये खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल करणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

यातील बाबा उस्मान शेख (वय ५०), सलीम उस्मान शेख (वय ४५), मोहसीन सलीम शेख (वय १८) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तय्यब बाबा शेख, असिफ रसूल शेख, बानो असिफ शेख, मुन्नी सलीम शेख, ईशा बाबा शेख, शमशाद उस्मान शेख, नम्मू अय्युब शेख, फैय्याज अय्युब शेख हे ८ आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post