आर्थिक वादातून घर व वाहने पेटवली... नगरमधील धक्कादायक घटना

आर्थिक वादातून घर व वाहने पेटवली... नगरमधील धक्कादायक घटना
नगर - आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून तसेच पैसे द्यावे लागू नयेत म्हणून घर व घरासमोरील वाहने पेटवून दिल्याचा प्रकार सावेडी उपनगरातील कॉटेज कॉर्नर रोडवर, श्रीरामनगर येथे घडला. याप्रकरणी किरण बापूदास महंत या व्यक्तीवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजय प्रभुणे यांनी फिर्याद दिली आहे. प्रभुणे व किरण महंत यांचे आर्थिक व्यवहार होते. प्रभुणे यांना महंत यांच्याकडून पैसे येणे बाकी होते. त्यामुळे महंत याने त्याचे श्रीरामनगर येथील घर प्रभुणे यांना राहण्यासाठी दिले होते. २ दिवसापुर्वी प्रभुणे हे रात्री घरात कुटुंबियांसमवेत झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराला बाहेरुन कडी लावून घरासमोरील रिक्षा व मोटारसायकल पेटवून दिली. तसेच घरालाही आग लावली. 

धुरामुळे श्वास गुदमरू लागल्याने प्रभुणे व त्यांचे कुटुंबिय जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र बाहेरुन कुलूप लावण्यात आलेले असल्याने त्यांना दरवाजा उघडता आला नाही. त्यावेळी त्यांनी खिडकी उघडून मदतीसाठी आरडाओरडा केला असता घराच्या संरक्षक भिंतीवरुन किरण महंत हा त्यांना पळताना दिसला. त्यानंतर शेजारील नागरिकांनी मदतीला येवून दरवाजा उघडला व आग विझवली. आरोपी किरण महंत याने आर्थिक वादातून हा प्रकार केला असल्याचे या फिर्यादीत प्रभुणे यांनी म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी किरण महंत (पूर्ण पत्ता माहित नाही) याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ४३५, ३४१, ३४२, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post