ओवेसींच्या 'एमआयएम'ला खिंडार.. जिल्हाध्यक्षासह नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.


ओवेसींच्या 'एमआयएम'ला खिंडार.. जिल्हाध्यक्षासह नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या पुढाकाराने आज एमआयएम पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन यांच्यासह लातूर नगरपंचायतीमधील अनेक नगरसेवकांनी आज पक्षप्रवेश केला.

यावेळी जयंत पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. धर्मनिरपेक्ष विचार जपण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. भाजपच्या काळात जातीयवाद फोफावत आहे, धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्ष विचारांच्या लोकांना सोबत येऊन लढावं लागेल. आपली लढाई ही भाजपच्या चुकीच्या विचारांविरोधात आहे. भाजपच्या विजयासाठी एमआयएमचा उपयोग केला जात असल्याचे आता लोकांच्या लक्षात आले आहे, त्यामुळे अनेक अल्पसंख्याक बांधव राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे वळत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. लातूर जिल्ह्यात काँग्रेसशी आपली आघाडी आहे. या आघाडीतून भाजपला पराभूत करण्याचे ध्येय आपण बाळगू, असे आवाहन पाटील यांनी केले. 

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सर्व मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच लातूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी जरगर शमशोदीन, अ. करीम, शेख फयाज नसोरुद्दिन, हाशमी इमरोज नुरोदीन,  इब्राहीम पटेल, शेख अहमद साथ सैलानी, एम. रफीभाई, सय्यद अन्वर हुसैन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी, नागनाथ जांभळे यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post