क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा...उद्या घोषित करणार नाव

 क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा;

उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार भांडाफोड – ना. नवाब मलिक


क्रुझवरील कारवाईमध्ये १० लोकांना पकडले होते मात्र त्यापैकी २ लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. ज्या दोघांना सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड शनिवारच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी आज दिली. त्या दोन लोकांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना ८ ते १० लोकांना पकडले आहे, असे सांगितले होते. त्यावेळी संपूर्ण कारवाई करत असलेला एक अधिकारी अशी अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता.
हा भाजपचा हायप्रोफाईल नेता कोण आहे त्याचं नाव उद्या घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदा म्हटले गेले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे त्यानंतर मग हा राजकीय कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा, असा सवाल करतानाच एनसीबीला याचं उत्तर द्यावंच लागेल असेही नवाब मलिक म्हणाले. परमबीर सिंह, शर्मा हे देखील जनतेचे सेवक होते परंतु देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्तीदेखील त्यातील आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.
कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या, त्यामध्ये २० किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामे आमचा विभाग करत आहे. जसजसे पुरावे हातात लागतील तसतशी यांची पोलखोल करणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post