सुमित वर्मा यांच्या ‘युवा अंडरग्राउंड’चे मनसे नेत्यांनी केले तोंड भरुन कौतुक

 सुमित वर्मा यांनी लिहिलेल्या ‘युवा अंडरग्राऊंड’ या पुस्तकाचे प्रकाशन


युवकांमध्ये असलेली अंडरग्राऊंड शक्ती राष्ट्र कार्याच्या उभारणीसाठी वापरल्यास देश महासत्ता होईल -वसंत मोरे    नगर - आपला देश ‘युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, समाज, प्रदेश आणि राष्ट्र घडविण्याची ताकद या पिढीत आहे. आपल्या देशाचे ‘भविष्य’ चांगले हवे असेल तर युवकांनीच त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. युवा ताकद योग्य जागी वापरता आली नाही तर तिचा उपयोग काय?  तारुण्य म्हणजे आयुष्याला मिळालेलं वरदान आहे. या वरदानाचा उपयोग करुन आपलं जीवन आपला समाज, आपला देश यांचे भलं करणं आपली जबाबदारीच आहे. या कर्तव्याच्या वाटेवर चालल्यावर पूर्ण समाजाला समृद्धी लाभेल. सुमित वर्मा या युवकांने युवकांचे मनातील भाव या पुस्तकातून व्यक्त करुन आजच्या युवकांना दिशा देण्याचे काम केले आहे. युवकांमध्ये असलेली अंडरग्राऊंड शक्ती राष्ट्र कार्याच्या उभारणीसाठी वापरल्यास आपला देश महासत्ता नक्कीच होईल, असे प्रतिपादन पुणे येथील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केले.

    मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी लिहिलेल्या ‘युवा अंडरग्राऊंड’ या पुस्तकाचे प्रकाशन नगरसेवक वसंत मारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगरसेविका रुपालीताई ठोंबरे (पुणे), उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महागायिका सन्मानिता धापटे, प्रा.मकरंद खेर, सचिन डफळ, किरण काळे, संतोष वर्मा, गणेश शिंदे आदि उपस्थित होते. या पुस्तकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले आहे.

    याप्रसंगी रुपालीताई ठोंबरे म्हणाल्या, आज अनेक सामाजिक, राजकीय, वैयक्तिक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर एकतर राजकीय किंवा मिडियावालेच यावर चर्चा करतांना दिसून येतात. काही युवकच त्यावर भाष्य करतात, परंतु अनेक युवकांच्या मनात ही व्यक्त होण्याची भावना असते. परंतु आजचा बहुसंख्य तरुण याच गटात मोडतो, फक्त आपलं एकटयाचं जगणं आजच्या युवकांना महत्वाचं वाटतंय, म्हणून ते अंडरग्राऊंड आहेत. त्यांना तिथून बाहेर काढून खरी दुनिया, त्यांची ताकद दाखविण्याचा प्रयत्न ‘युवा अंडरग्राऊंड’ या पुरस्तकातून झाला आहे. भविष्यात हा अंडरग्राऊंड तरुण जागा होऊन समाज व देश कार्यात आपले योगदान देईल ही खात्री आहे.

    याप्रसंगी लेखक सुमित वर्मा म्हणाले, सामाजिक काम सुरु केलं तेव्हापासून आजपर्यंत अनेक अनुभव आले. मी धडपडलो, चुकलो आणि त्यातूनच खूप काही शिकलो. आपल्या एकूण सार्वजनिक जीवनात काय सुधारणा कराव्यात, युवा शक्तीमध्ये नवचैतन्य कसं निर्माण करावं, देश-समाज म्हणून कोणत्या कमतरता आहेत याची जाणीव या अनुभवातून झाली आणि शब्दरुपी हे पुस्तक तयार झाले. यातून युवकांनी आत्मपरिक्षण करुन एक चांगला समाज घडवावा, एवढीच अपेक्षा आहे.

    याप्रसंगी नरेंद्र फिरोदिया म्हणाले, युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे, त्यामुळे युवकांनी आपल्या भावना या व्यक्त केल्या पाहिजे. तेव्हाच त्याचा देश घडविण्यासाठी उपयोग होईल. युवकशक्तीवर देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने त्यांनी स्वत:पुरता विचार करता देशाचा विचार करुन आपआपल्या परिने योगदान दिले पाहिजे. अंडरग्राऊंड असणार्‍या युवकांना हे पुस्तक ग्राऊंड मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला.

    यावेळी प्रा.मकरंद खेर, सन्मित्रा धापटे आदिंसह पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांनीही शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन स्वयंभू प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रकाश गायकवाड, संकेत जरे, स्वप्निल वाघ, प्रमोद जाधव, आदेश गायकवाड, प्रमोद ठाकूर, ओंकार काळे, अक्षय जाधव, पांडूरंग काळे आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post