नगर जिल्ह्यात महिला सरपंचाचा विनयभंग, तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरुन वाद...

नगर जिल्ह्यात महिला सरपंचाचा विनयभंग, तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरुन वाद... श्रीगोंदे - तालुक्यातील उक्कडगाव येथे काल  ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड होती.  सभेत दिलीप कातोरे यांनी अनिल दशरथ महाडीक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. महिला असलेल्या तेथील सरपंचांनी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी गणेश महाडीक यांचे नाव जाहीर करताच, अध्यक्षपद आम्हाला मान्य नाही, असे म्हणत विरोधी गटाने गोंधळ घातला. यात महिला सरपंचांना धक्काबुक्की व विनयभंग केल्याची फिर्याद आहे. 

विलास तुकाराम महाडीक, राहुल सोपान महाडीक, नितीन सोपान महाडीक, संकेत भीमक महाडीक, अनिल दशरथ महाडीक, राजू बाबूराव कातोरे, दशरथ बापूराव कातोरे, दिलीप कौशीराम कातोरे आदींनी गोंधळ घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरपंचांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. अर्ध्या तासासाठी सभा तहकूब करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात जात असताना विलास तुकाराम महाडीक यांनी पाठीमागून येऊन त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

उपसरपंच बापू कातोरे, विश्वास कातोरे व सदस्य प्रसाद महाडीक यांनी, सरपंचांना शिवीगाळ करू नका, असे म्हणताच दोन्ही गटांत बाचाबाची झाली. ग्रामविकास अधिकारी राजू विधाते यांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधी गटातील उमेदवार निघून गेले. 

तंटामुक्ती अध्यक्षांची निवड जनतेतून व्हावी, ही आमची इच्छा आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तेथे फक्त बाचाबाची झाली. दिलेली फिर्याद ही राजकीय द्वेषातून देण्यात आली आहे. तसे काही घडलेले नाही अशी प्रतिक्रिया विलास महाडिक यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post