समृद्धीच्या वाटेवरील नगर तालुक्यातील १६ गावांचा पाणी फाऊंडेशनकडून सन्मान

 समृद्धीच्या वाटेवरील नगर तालुक्यातील १६ गावांचा पाणी फाऊंडेशनकडून सन्मान

 


नगर- पाणी फाऊंडेशनच्या  सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगर तालुक्यातील १६ गावांचा पाणी फाऊंडेशनच्या वतीने आदर्श गाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार, पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


यावेळी नगर तालुका कृषी अधिकारी नवले, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, तालुका समन्वयक दिलीप कातोरे   आणि नगर तालुक्यातील सर्व जल मित्र उपस्थितीत होते. समृद्ध गाव मिनी स्पर्धेत  उत्कृष्ट काम करणाऱ्या  नगर तालुक्यातील  सोनेवाडी (चास), रांजणी, मांजरसुंबा, कोळपे आखाडा, बाबूर्डी बेंद, पिंपळगाव वाघा या गावांचा सन्मान करण्यात आला तसेच सारोळा कासार, शेंडी, वडगाव तांदळी, जेऊर, धनगरवाडी, कौडगाव, देहरे, देवगाव, दशमी गव्हाण या गावांनी विशेष कार्य केल्यामुळे त्यांचा ही सत्कार करण्यात आला. 


पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी गावांना मार्गदर्शन करताना समृद्ध गाव स्पर्धेतील सहा स्तंभावर सविस्तर चर्चा केली व गावांना समृद्ध करायचे असेल तर समृद्ध गाव  स्पर्धा प्रत्येक गावामध्ये नियोजित पद्धतीने राबवा...समृद्ध गाव  स्पर्धा म्हणजे स्वतःच्या शेतामध्ये स्वतःसाठी जमिनीवरती उपचार करायचे आहे. म्हणजे बांध बंदिस्त करणे, जलव्यवस्थापन करणे, आधुनिक शेती करणे, पशु संवर्धन करणे, सेंद्रिय खत बनवणे, गट शेतीच्या माध्यमातून स्वतःचे उत्पन्न वाढवणे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हे गरजेचे आहे, असे सांगितले.


पद्मश्री पोपटराव पवार यांनी आजचे आदर्श हिवरेबाजार हे अनंत अडचणीना सामोरे जाऊन उभे झाले आहे, तुम्हालाही गावात विकासाची कामे करताना अनेक अडचणी येणार आहेत त्यामुळे समृद्धगाव स्पर्धेत काम करताना  निराश न होता आपणास संयम व सातत्याने हे काम करावं लागणार आहे. आपलं ध्येय हे निश्चित असायला हवं आणि आपण ध्येयवादी वृत्तीने ते पूर्ण करायला हवं. यावेळी पवार यांनी त्यांच्या जीवनातील अनेक बाके प्रसंग सांगून त्यावर कशी संयमाने मात केली हे त्यांच्या भाषाशैलीतुन सांगितले. तालुका कृषी अधिकारी श्री. नवले यांनी कृषी खात्याच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन केले.  यानंतर प्रत्येक बक्षीस पात्र गावांचा प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post