आगळा-वेगळा शिक्षक दिन..28 वर्षांनंतर झाली गुरू-शिष्यांची भेट...!

 अन् 28 वर्षांनंतर झाली गुरू-शिष्यांची भेट...!

सीताराम सारडा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला आगळा-वेगळा शिक्षक दिनअहमदनगर (प्रतिनिधी) - सुमारे 28 वर्षांनी विद्यार्थ्यांशी झालेली एकत्रित भेट... त्यांच्याकडून झालेल्या सन्मानाने शिक्षकांच्या डोळ्यात-मनात आलेली भावूकता.. अन् त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून समाधानी पावलेले विद्यार्थी... अशा आगळ्या-वेगळ्या वातावरणात सीताराम सारडा विद्यालयाच्या सवंगडी 93 ग्रूपचा शिक्षक दिन साजरा झाला.

शालेय जीवनानंतर विद्यार्थी एकमेकांपासून दुरावतात. शाळेतील जुने मित्र पुन्हा एकत्रितपणे भेटावेत, या उद्देशाने सीताराम सारडा विद्यालयाच्या 1993 च्या काही विद्यार्थ्यांनी व्हाट्स अप ग्रूपच्या माध्यमातून इतर मित्र जोडले. शिक्षकांची भेट घेण्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधण्याची संकल्पना काहींनी मांडली. त्याला इतर विद्यार्थ्यांनी संमती दिली. त्यानुसार शिक्षकदिनी विद्या भालेराव, चंद्रकांत वराडे, देविदास खेतमाळीस या गुरूवर्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा रोप, मिठाई व शुभेच्छापत्र देऊन सन्मान केला. या सन्मानाने शिक्षक भारावून गेले. 28 वर्षांनंतरच्या भेटीने झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. त्यामुळे विद्यार्थीही भलतेच खूष झाले. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांची आपुलकीने नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक विचारपूस करून यथोचित पाहुणचार केला. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तसेच शिक्षकांनी त्यांच्या निवृत्तीपश्चात दिनक्रमाबाबत माहिती सांगितली. बॅचच्या स्थानिक, परजिल्ह्यातील व  परदेशातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

या वेळी माजी विद्यार्थी वैशाली पांडे-जोशी, शैलेजा भवार-दरंदले, संदीप जाधव, शिवकुमार घोडके, उमेश उपाध्ये, बबन काशिद, विनोद कंदूर, अनिल भांडेकर, गणेश शेंदूरकर आदी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपलब्ध होऊ न शकलेल्या इतर शिक्षकांचीही लवकरच भेट घेण्याचे या वेळी ठरले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post