स्वतंत्र सावेडी, केडगाव पोलीस स्टेशन मंजुरीची काँग्रेसने केली मागणी

 नाशिक परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांची शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भेट ;

स्वतंत्र सावेडी, केडगाव पोलीस स्टेशन मंजुरीची काँग्रेसने केली मागणी


प्रतिनिधी : सावेडी आणि केडगाव उपनगराचा विस्तार वाढला असून या भागाची लोकसंख्या देखील वाढली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची असणारी संख्या कमी आहे. यामुळे नागरिकांना पुरेशा पोलिसी सेवा मिळत नाहीत. त्यामुळे नगर शहरामध्ये स्वतंत्र सावेडी उपनगर पोलीस स्टेशन व केडगाव पोलीस स्टेशन मंजूर करण्यात यावे, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांची नाशिक येथे समक्ष भेट घेत काँग्रेसच्या वतीने केेली आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पदाऐवजी गृह विभागाने पोलिस उप महानिरीक्षक पदाची निर्मिती करून येथे मुंबई गुन्हे शाखेचे अपर आयुक्त बी. जी. शेखर यांची नुकतीच नव्याने नियुक्ती केली. काळे यांनी शेखर यांचे भेट घेत नगर शहरातील पोलीस स्टेशनच्या मागणीसह शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत चर्चा केली आहे. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात किरण काळे यांनी म्हटले आहे की, नगर शहर आणि शहरा लगतच्या परिसरासाठी तोफखाना पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, भिंगार पोलीस स्टेशन आहेत. नगर शहरातील सावेडी उपनगर तसेच केडगाव उपनगर या दोन उपनगरांचा विस्तार हा अलीकडच्या काळात अधिक झाला आहे. 

यामुळे तोफखाना पोलीस स्टेशन व कोतवाली पोलीस स्टेशन या आत्ताच्या दोन पोलीस स्टेशनवर अधिकचा भार निर्माण झाला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध असणारी पोलीस संख्या ही खूपच कमी आहे. यामुळे या दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये होणारे विविध गुन्हे आणि त्यांचा तपास याकामी पोलीस यंत्रणेला मर्यादा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित पोलिसी सेवा मिळणे कठीण झाले आहे. 

या बाबींचा विचार करता सावेडी उपनगरासाठी स्वतंत्र सावेडी उपनगर पोलीस स्टेशन तसेच केडेगाव उपनगरासाठी स्वतंत्र केडगाव पोलीस स्टेशन होणे आवश्यक आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post