काँग्रेसकडून बंद पडलेल्या आयटी पार्कची पोल-खोल, काँग्रेसने समोर आणले धक्कादायक वास्तव

  काँग्रेसकडून बंद पडलेल्या आयटी पार्कची पोल-खोल ; 

  तरुणांचे लाखो रुपयांचे पगार बुडवून आयटी कंपन्यांचा पोबारा,

  काँग्रेसने नगरकरां समोर आणले धक्कादायक वास्तव, 

 आयटी पार्कमध्ये चर्चेला येण्याचे किरण काळेंचे संग्राम जगतापांना खुले आव्हान



नगर  : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. संग्राम जगताप यांनी आयटी पार्कच्या नावाखाली मोठा ढोल बडवत नगर शहराला हैदराबाद, पुणे, बंगलोरच्या धर्तीवर आयटी हब करणार असा कांगावा करत तीन हजार पेक्षा जास्त तरुण-तरुणींच्या मुलाखती आपल्या स्वतःच्या आयुर्वेद येथील खाजगी कार्यालयात घेतल्या. यातील अनेकांना नोकऱ्या पण दिल्या. पण आता ज्यांना नोकऱ्या दिल्या त्यांचे  पगार बुडवून त्यांना हाकलून देत आ.जगताप यांनी आयटीपार्कच्या नावाखाली नगर शहरातील तरूणाई, त्यांचे पालक यांच्या भावनांशी खेळत त्यांना गंडा घालत फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. 

काँग्रेसने आयटी पार्कमध्ये प्रत्यक्ष पाहणी करत आयटी पार्कच्या वास्तवाची पोलखोल केली आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये आयटी पार्क सुरू केला होता. त्याला आता दोन वर्ष झाली आहेत. कोरोना संकट काळामध्ये जगातील अनेक व्यवसाय बुडीत निघाले. मात्र आयटी क्षेत्र हे याला अपवाद होते. कोरोना काळात सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून का होईना पण आयटीमध्ये कुणाच्याही नोकऱ्या गेल्या नाहीत. कोरोना काळातच फेब्रुवारी २०२१ मध्ये स्वतः जगताप यांनीच आयटी पार्कमध्ये मोठा कार्यक्रम करत कोरोना असून देखील आम्ही आयटी पार्क मध्ये तरुणांना नोकऱ्या दिल्या आणि देशभरातील अनेक कंपन्या इथे आम्हाला जागा मागत आहेत असे नगरकरांना जाहीरपणे सांगितले होते. 

किरण काळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यां समवेत आयटी पार्कची आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी फक्त एका फायनान्स कंपनीच्या वसुलीसाठी कॉल सेंटर म्हणून काम करणारी बिपिओ कंपनी, सहा- सात लोकं काम करणारी ईआरपी डेवलपमेंट कंपनी आढळून आली. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणतीही आयटी कंपनी आढळून आली नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे. काळे यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधला असता यामध्ये एकही सॉफ्टवेअर इंजिनियर सापडला नाही. तसेच बारावी पास मुले टेली कॉलिंगचे काम करताना आढळून आली. या ठिकाणी आयटी कंपन्यां ऐवजी लॉजिस्टिक कंपन्या, ट्रेडिंग कंपन्या तसेच लेबर कॉन्ट्रॅक्टर ऑफिसेस थाटलेली आहेत. याठिकाणी सिगरेटची पाकिटे, देशी दारूच्या बाटल्या आणि प्रचंड घाण काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पाहायला मिळाली. 

पाहणीनंतर किरण काळे म्हणाले की, आयटी पार्कचे वास्तव हे धक्कादायक आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर शहरातल्या तरुणाईला मतदाना पुरते आकर्षित करण्यासाठी आयटी पार्कचे ढोंग जगताप यांनी रचले होते. आयटी पार्क मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सात ते आठ राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय कंपन्या मी आणल्या असून अडीचशे तरुणांना रोजगार दिला आहे असे तात्पुरते नाटक उभे केले गेले. आयटी पार्क मधीलच काही युवक, युवती तसेच त्यांच्या आई-वडिलांच्या उपस्थित स्वतःचा उमेदवारी अर्ज देखील विधानसभेला त्यांनी भरला. आयटी पार्कच्या इमारतीची रंगरंगोटी, डागडुजी केली. पहिल्या टप्प्यात अडीचशे युवकांना मी नोकरी दिली असून डिसेंबर २०१९ पर्यंत एक हजार मुलांना याठिकाणी नोकरी देणार असल्याची बतावणी जगताप यांनी केली होती. 


आयटी पार्कची आम्ही पोलखोल केलीच आहे. भयाण वास्तव नगरकरां समोर आणले आहे. नगर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरा तसेच नोकरी देण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या तरूणाई समोर आपण या ठिकाणी मोठी भाषणबाजी केली. त्या सर्वांना पुन्हा एकदा आपण निमंत्रित करू आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी जाहीर प्रश्न विचारून त्या जाहीर प्रश्नांची आपण पुराव्यानिशी जाहीरपणे खरी उत्तरे द्या असे आव्हान किरण काळे यांनी आ. संग्राम जगताप यांना दिले आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post