बाजार समितीत परिवर्तन घडविण्यासाठी नगर तालुक्याने महाविकास आघाडीला साथ द्यावी : प्रा.शशिकांत गाडे

 बाजार समितीत परिवर्तन घडविण्यासाठी नगर तालुक्याने महाविकास आघाडीला साथ द्यावी : प्रा.शशिकांत गाडे

रूईछत्तीशी येथे शिवसेना शाखा नूतनीकरण व फलक अनावरण कार्यक्रम
नगर : गावामध्ये शिवसेना शाखेचा फलक दिसल्यानंतर सर्वसामान्य माणसाला आधार मिळतो हा अनुभव अनेक वर्षे सर्वांनी घेतला आहे. त्यामुळेच आता नगर तालुक्यात प्रत्येक गावात शिवसेना शाखा व फलक बसविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रूईछत्तीशी गावाने जिल्हा परिषद, पंचायत समितीला शिवसेनेला नेहमीच साथ दिली आहे. आता बाजार समितीची सत्ताही महाविकास आघाडीच्या ताब्यात देण्याची गरज आहे. बाजार समितीतील सत्ताधार्‍यांनी केलेला मोठा भ्रष्टाचार जगजाहीर आहे. रिकाम्या जागा, शौचालय, कोंडवाड्याच्या ठिकाणी गाळे बांधून ते विकण्याचा उद्योग चालू आहे. संचालक मंडळ केवळ नामधारी असून सर्व कारभार एकाच व्यक्तीच्या हातात आहे. शेतकर्‍यांच्या हक्काची बाजार समिती वाचण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. त्यासाठी नगर तालुक्याने साथ द्यावी, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.

नगर तालुक्यात शिवसेनेने गावागावात शिवसेना शाखा नूतनीकरण, फलक अनावरण कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत रूईछत्तीशी येथे शिवसेना फलकाचे अनावरण प्रा.गाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, संदीप गुंड, डॉ.दिलीप पवार, युवा सेना तालुका प्रमुख प्रविण गोरे, प्रविण कोकाटे, नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, रवींद्र भापकर, किरण भापकर, प्रकाश कुलट, सोमा पोकळे, आदिनाथ नवसुपे, संजू भोर, संपत वाघमारे आदी उपस्थित होते.

प्रा.गाडे पुढे म्हणाले की, शिवसेना म्हणजे विश्वासाचे नाव आहे. नगर तालुका पंचायत समिती अनेक वर्षांपासून शिवसेना व महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. या माध्यमातून दर्जेदार कामे करण्यावर भर दिला जातो. त्यामुळेच इतक्या वर्षात कोणालाही आमच्या कारभारावर बोट ठेवता आलेले नाही. लोकांसाठीची कामे भ्रष्टाचारमुक्त व दर्जेदार व्हावीत हाच शिवसेनेचा प्रयत्न असतो. रूईछत्तीशी परिसरात स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न ग्रामस्थांनी एकत्रित बसून सोडवावा. नंतर कामासाठी निधी थेट मुंबईहून मंजूर करून आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राजेंद्र भगत म्हणाले की, प्रा.गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यात शिवसेना अतिशय सक्षमपणे काम करीत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम फक्त शिवसेनाच करू शकते हे सर्वांना माहिती आहे. तालुक्यात संघटना मजबूत करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी संदेश कार्ले, शरद झोडगे आदींचीही भाषणं झाली. कार्यक्रमास राजकुमार गोरे, बिभीषण सपाटे, नाथ महाराज, माणिक गोरे, प्रभाकर गोरे, राहुल कुंजीर, संजू बोरकर, अजिनाथ नवसुपे, सोमनाथ गोर आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post