पारनेर तालुक्यातील इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम चळवळीचा अवलिया हरपला..

 नव्वदीच्या दशकात पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये फा. बाखर यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून पाणलोटाबाबत गावकऱ्यांना जागृत केलेइंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम चळवळीचा अवलिया हरपला.. 

पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंड या निसर्गरम्य देशात जन्मलेल्या फा. हर्मन बाखर या अवलियाने आपल्या आयुष्याच्या ९७ वर्षातील ६० वर्ष भारतात विशेषतः महाराष्ट्रात घालवली. दुष्काळी भागाला माथा ते पायथा उपचार पद्धतीने माती अडवा पाणी जिरवा हा मंत्र दिला. या करिता जर्मन सरकारकडून नाबार्ड बँकेमार्फत भारतात जगप्रसिध्द असा इंडोजर्मन पाणलोट क्षेत्र कार्यक्रम सुरु करून या प्रकल्पाचे प्रणेते बनले.. 

स्वतः श्रमदान करत लोकांना श्रमदान व एकीचे महत्व पटवून दिले. गावकऱ्यांचा सहभाग मिळविला. मा.क्रिस्पिनो लोबो व डॉ. मनिषा मार्सेला यांचे बरोबर वॉटर संस्थेची स्थापना करून भारतभर अनेक गावांमध्ये इंडोजर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम पोहचविला.   


या महान कार्याप्रती जर्मन सरकारने त्यांना "फेडरल क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरीट " हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतात येऊन जर्मन वित्त मंत्री यांनी प्रदान केला. तसेच महाराष्ट्र सरकार ने सन१९९४ मध्ये "कृषी भूषण"  सन १९९६ मध्ये "वनश्री" व सन २०१० मध्ये "डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न" पुरस्कार देऊन सन्मानित केले. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाबाबतच्या डॉ. स्वामीनाथन समिती चे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.      


   पाणलोट कामाबाबत 

          "इथे नाही तर कुठे?

           आता नाही तर कधी?

           मी नाही तर कोण? "

हा मंत्र देउन गावातील लोकांना जागृत करत पाणलोट चळवळीतील माझ्या सह अनेक कार्यकर्ते घडविले..

       पाणलोट विकासाचे जनक फादर हर्मन बाखर यांचे आज १४ सप्टेंबर २१ रोजी स्वित्झरलँड येथे  ९७ व्या वर्षी निधन झाल्याचे समजले. संस्था परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली....

साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शेतीवर त्याचा परिणाम झाला, पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत असे. पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात व मराठवाड्यात त्याची तीव्रता अधिक होती. स्वित्झरलँडमधील फादर हर्मन बाखर भारतात आले असता, त्यांनी महाराष्ट्रातील  परिस्थिती पहिली व महाराष्ट्राला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी आपल्या काही सहकार्यांसह 'वॉटर' या संस्थेची सुरुवात केली. भारत व जर्मन शासन यांच्यात  द्विपक्षीय करार घडून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.  नाबार्ड व KFW यांच्या सहकार्याने  "इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमा"ची सुरुवात केली. संस्थेने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातील पहिला प्रकल्प डोणगाव येथे लोकसहभागातून यशस्वीरीत्या राबविला. या कार्यक्रमांतर्गत संस्थेने आज अनेक गावे जलसमृद्ध केली आहेत. फादर बाखर यांनी संस्कृति संवर्धन मंडळ सारख्या अनेक संस्था व व्यक्ती पाणी याविषयी काम करण्यासाठी प्रेरित केल्या आहेत. फादर बाखर हे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे  जनक आहेत. त्यांनी डोणगाव प्रकल्प व संस्थेस भेट दिली होती. ग्रामीण भारतातील अनेक गावे जलसमृद्ध करण्यासाठी फादर यांनी आयुष्यातील ६० वर्ष भारतात घालवली. फादर स्वतः गावकर्यांसोबत श्रमदानात उत्साहाने भाग घेऊन  त्यांच्या सोबत  भाकरी चटणीचा आस्वाद घेत असत. अगदी साधे जीवन जगणारा हा अवलिया नेहमी, 'पाणी ही समस्या असेल, तर पाणी हेच  त्याच्यावर उपाय आहे', त्याकरिता पाणलोट क्षेत्र  विकास हाच दुष्काळावरचा कायमस्वरूपी इलाज आहे असे म्हणत. महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती व संस्थांच्या  तांत्रिक सक्षमीकरणासाठी नगर जिल्ह्यातील दरेवाडी येथे प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली. या केंद्रातून अनेक संस्था व कार्यकर्ते घडत असून, आजही पाणी या क्षेत्रात योगदान देत आहेत. साधारण २० वर्षांपूर्वी संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन तथा जलनायक प्रमोद देशमुख यांच्यासोबत मला अहमदनगर येथे फादर बाखर यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता,  त्यावेळी ते ७५ वर्षांचे होते, त्याही वयात त्यांचा काम करण्याचा उत्साह जवळून अनुभवला. समाजासाठी शेवटपर्यंत कार्यमग्न असणारे संस्कृति संवर्धन मंडळाचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख व फादर बाखर या दोघामध्ये मला साम्य दिसून येते. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने फादर बाखर यांचे नाव  व कार्य अजरामर राहील. दुष्काळी भागातील लाखो दिनदुबळ्यांना स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवणाऱ्या या महान विभूतीस संस्था परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.

                                                                       

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post