नगर जिल्ह्यातून राज्यात तिसर्‍या लाटेची सुरुवात? प्रशासनाकडून चिंता व्यक्त

नगर जिल्ह्यातून राज्यात तिसर्‍या लाटेची सुरुवात? प्रशासनाकडून चिंता व्यक्त नगर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे.   जिल्ह्यातून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल की काय, अशी भीती आता वाटते आहे. जिल्ह्यात आज पाच हजारपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येते, असे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले.

त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (दि. २१) त्यांनी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि तालुक्यातील निमोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

आराेग्य विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नोडल ऑफिसर डॉ. सीमा घोगरे आदी यावेळी उपस्थित होते.

गमे म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. लोकांनी जी शिस्त पाळायला हवी, ती पाळली जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असूनही आठवडे बाजार अनेक ठिकाणी सुरू असल्याचे निर्देशनास आले. दुकानदार, ग्राहक मास्क वापरताना दिसत नाही. हॉटेल्समध्ये गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात येणे फार मुश्कील बाब आहे. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला आणि कारवाई करायला त्यांना सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post