मिस्टर एशिया किताब मिळवणार्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू, टिव्ही केबलमधील वीज प्रवाह ठरला जीवघेणा

 

नगर हळहळले... मिस्टर एशिया किताब मिळवणार्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू, टिव्ही केबलमधील वीज प्रवाह ठरला जीवघेणा



नगर: टिव्हीला जोडलेल्या  केबलमध्ये  वीजप्रवाह उतरल्याने शॉक लागून एका खेळाडूचा मृत्यू झाला, असा दावा करत केबलच्या गैर प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे महापालिका व महावितरणच्या  अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे जागरूक नागरिक मंचने म्हटले आहे. याबाबत मंचचे डॉ.सुहास मुळे यांनी माध्यमांना माहिती दिली.

ही घटना 1 रोजी सायंकाळी साईनगर  विनायक नगर परिसरात घडली. अजिंक्य सुरेश गायकवाड (वय 28) हा घरात आलेली टिव्ही केबल व्यवस्थित जोडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या केबलमध्ये वीजप्रवाह उतरलेला असल्याने धक्का बसून काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. अजिंक्य हा प्रसिद्ध गोळाफेकपटू होता. त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचे चिरंजीव व जागरूक नागरिक मंचचे सदस्य दत्ता गायकवाड यांचा तो पुतण्या आहे. 

घटनेनंतर सुहास मुळे, दत्ता गायकवाड यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. टिव्ही केबलमध्ये  करंट उतरलेला होता. सदरची केबल हाय टेन्शन लाईनवरून जम्पिंगकरून आणि पॅरलल पद्धतीने घरोघरी पोहोचवण्यात आलेली आहे. हा प्रकार बेकायदेशीर असून संपूर्ण शहरामध्ये अशा प्रकारच्या केबल महावितरणच्या खांबावरून, महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटचा आधार घेत करंट वाहणार्‍या तारांना चिकटून घरोघर पोहोचलेल्या आहेत. याकडे महानगरपालिका व महावितरणच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे. यामुळेच गायकवाड परिवारावर दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. संबंधित सर्व अधिकार्‍यांवर वैयक्तिक रित्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जागरूक नागरिक मंचने माध्यमांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post