पोलिसांची मोठी कारवाई...गुटख्यासह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जण ताब्यात

 

नगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई...गुटख्यासह १५  लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जण ताब्यातनगर: दोन टेम्पोमधून गुटखा वाहतूक करणार्‍या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  अटक केली. शेख नासिर अहमद चाँदमिया (वय 44 रा. गाडेकर गल्ली, भिंगार), शेख अय्याज नसीर (वय 39 रा. मोमीन गल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख (वय 34 रा. नागरदेवळे ता. नगर), सय्यद आसीफ महेमूद (वय 42 रा. मोमीन गल्ली, भिंगार), सादीक खान इमाम पठाण (वय 48 रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. 


त्यांच्याकडून हिरा गुटखा, रॉयल 717 तंबाखू व दोन टेम्पो (एमएच 16 सीसी 4920), (एमएच 16 सीसी 3621) असा 15 लाख 62 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांचा एक साथीदार शेख अब्दूल रऊफ (रा. मोमीन गल्ली, भिंगार) हा पसार झाला आहे. पोलीस शिपाई कमलेश पाथरूट यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नगर-दौंड रोडवरील अरणगाव (ता. नगर) चौक येथे ही कारवाई करण्यात आली.काही इसम दोन टेम्पोमधून नगर-दौंड रोडने नगर शहरात गुटखा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून निरीक्षक कटके यांनी सहायक निरीक्षक गणेश इंगळे, सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी मन्सूर सय्यद, संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, राहुल सोळुंके, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते यांच्या पथकाला कारवाई बाबत सूचना केल्या. पथकाने अरणगाव चौक येथे सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो येताच पोलिसांनी त्यांना अडविले. पंचासमक्ष दोन्ही टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये हिरा गुटखा व रॉयल 717 तंबाखू मिळून आली.


सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post