राळेगणसिद्धी परिसर आता निलेश लंके यांच्यामुळे ओळखला जाईल, जयंत पाटील यांची स्तुतीसुमने

 


भाजप नेते किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं ? असा सवाल करतानाच ईडीचे नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं ? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा  थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पारनेर येथे केला. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कट-कारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत करायला हवे, असे आवाहन जयंत पाटील यांनी पारनेर येथील राष्ट्रवादी परिवार संवादात केले.

निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरीच उरला नाही तर पाणी मिळून फायदा काय ? म्हणून या अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करत, पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ ही महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे. मात्र बेसुमार महागाई  आणि दरवाढ होऊनही यावर कोण आंदोलन करत नाही. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना महागाईची एकप्रकारची सवयच लावली आहे. पक्षाच्या माध्यमातून हे विषय लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आमदार निलेश लंके यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. त्यांनी कोरोनाकाळात जे काम केले ते न भूतो ना भविष्यती आहे. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून निलेश लंके यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळे आज तरूण पिढीचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असून तरुण पिढी पक्षाच्या पाठिशी उभी राहात असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. राळेगणसिद्धी हा परिसर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाने ओळखला जातो, आता तो लोकनेते निलेश लंके यांच्या नावाने ओळखला जाईल, असेही जयंत पाटील म्हणाले. 

यावेळी आमदार निलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अहमदनगर निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post